सांगली : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी अद्याप चर्चेचा घोळ सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तानाजीराव पाटील यांनी शनिवारी आपली उमेदवारी दाखल केली. विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था गटातून उमेदवारी दाखल करण्याची मुदत सोमवार अखेर असून शिवसेनेची उमेदवारी दाखल झाल्यानंतर महायुतीतील भाजपची भूमिका काय असणार याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक संस्था गटातून शिवसेनेचे श्री. पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ. शीतल बाबर, विनायक मासाळ, जिल्हा परिषदेतील बांधकाम सभापती ऋतुराज पाटील, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते जयदीप भोसले, अॅड. विद्या मोटे, अनिल पाटील, अमोल मोरे, विजय देवकर, बाळासाहेब हजारे आदी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या फेर्या सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाने सांगली-सातारा जागेवर आपला हयक सांगत आज प्रत्यक्ष उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे या जागेबाबत आता भाजप काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना श्री.पाटील यांनी सांगितले, आमदार सुहास बाबर आणि शिवसेनेचे सांगलीचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी उमेदवारी बाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच सांगली-सातारा जागा लढविण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा झाली असून यानंतरच उमेदवारी दाखल केली आहे.
स्व. आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली गेली ३२ वर्षे राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असल्याने आपलाही सांगली, सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांशी संपर्क आला असून सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत. या मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाचे ११९ मतदार असून अन्य राजकीय पक्षातही आपले मित्र आहेत. त्यांची आपणास निश्चित मदत होईल या विश्वासावर आपण उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी ठेवणार की मागे घेणार असा सवाल उपस्थित करताच श्री. पाटील म्हणाले, याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळीवर अवलंबून असून आपण आजअखेर माघार कधीच घेतली नाही.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्था गटामध्ये एकूण ८५३ मतदार असून भाजप ३१४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २०५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार )११९, काँग्रेस ७३, शिवसेना (शिंदे) ११९, शिवसेना (ठाकरे) १ आणि स्थानिक आघाडी व अपक्ष ३० असे संख्याबळ आहे. महायुती अथवा महाविकास आघाडीने उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. तर सांगली जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडीसोबत सत्तेत आहे. तर सातार्यात जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी महायुतीअंतर्गत भाजप व शिवसेना यांच्यात टोकाचा संघर्ष झाला होता. यामुळे या निवडणुकीत उमेदवार निश्चितीवरून महायुतीअंतर्गत संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
