सांगली :  सांगली-सातारा स्थानिक प्राधिकार मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारापैकी सीमा पोतदार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला  असून किशोर धुमाळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप असल्याने याबाबतचा निर्णय राखीव ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.

निवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी सीमा पोतदार यांची उमेदवारी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता नसल्याने अवैध ठरली, तर धुमाळ यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला. याबाबत कायदेतज्ञांनी युक्तीवाद केला असून अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आला असून आज रात्री उशिरा याबाबतचा निर्णय दिला जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची दि. ४ जून अखेर म्हणजे शुक्रवारअखेर मुदत असून यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण मतदार ८९५ असून यापैकी ४५२ मतदार महिला आहेत. सातारा जिल्ह्यातील ४७३, तर सांगली जिल्ह्यातील ४२३ मतदारांना  मतदानाचा हक्क आहे. सातारा व सांगली जिल्ह्यातील   पंचायत समिती सभापती, दोन्ही जिल्हा परिषदेचे सदस्य, सातारा ९ सांगली ५ अशा १४ नगरपालिका आणि सातारा ७ व सांगली ६ अशा १३ नगरपंचायतीचे आणि सांगली महापालोकेचे ८६ सदस्य मतदार आहेत. विधान परिषद सदस्य निवडीसाठी सातारा जिल्ह्यात ७ व सांगली जिल्ह्यात पाच मतदान केंद्रे असून दि. १८ जून रोजी मतदान होणार आहे.