सांगली : शिराळा येथे साजरी होणारी जगप्रसिध्द नागपंचमी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून साजरी करावी, कायद्याचे पालन करून नागपंचमी साजरी करावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बत्तीस शिराळा येथील नागपंचमी उत्सव नियोजन बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, उपवनसंरक्षक सागर गवते, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील, मानद वन्यजीव रक्षक विशाल पाटील, कांचन सुतार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी उत्सव हा केवळ सांगली जिल्ह्यापूरताच नव्हे, तर राज्यातही प्रसिद्ध आहे. राज्याच्या विविध भागातून अनेक नागरिक ह्या उत्सवासाठी येत असतात. कायद्यातील तरतुदींचे पालन होण्यासाठी वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासन दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. घोष म्हणाले, शिराळा येथील नागपंचमी सणासाठी वन विभाग, महसूल व पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.
वन विभागाकडून या कालावधीत शिराळा व आसपासच्या परिसरात गस्तीसाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून वन अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून नागपंचमी साजरी करण्यासाठी पत्रके व ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
