सांगली : एकल महिलांना  विधवा म्हणून संबोधन्याऐवजी देवमाता म्हणून संबोधन्याचा निर्णय शिरसी (ता. शिराळा) येथील ग्रामपंचायतीने घेतला असून सामाजिक कार्यात सहभागी करून मानसन्मान देण्याबरोबरच त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हे संबोधन वापरण्यात येणार आहे. या निर्णयाचे शिराळा पंचायत समितीच्या मासिक सभेत स्वागत करून शिरसी ग्रामपंचायतीचे अभिनंदन करण्यात आले.

अवघे सातशे-आठशे उंबर्‍याचे गाव असलेल्या शिरसीच्या सरपंच आहेत स्मिता भोसले आणि ग्रामपंचायत अधिकारी आहेत प्रसाद पाटील.गावात २०२३ पासूनच विधवांना मानसन्मान देण्याचा पुरोगामी निर्णय घेण्यात आला. मात्र, समाजात विधवांना मानसन्मान मिळत असला तरी मनाला झालेली वेदनेची सल कायम राहिली होती. यातून नव्यानेच लोकनियुक्त सरपंच श्रीमती भोसले यांनी वेगळं काही तरी करायची कल्पना मांडली.

विधवा हे संबोधन एकल महिलांना एखाद्या शिवीसारखे वाटते. यावर उपाय म्हणून समाजानेच त्यांना वेगळी ओळख दिली तर त्यांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे येतील असे समजून सरपंच श्रीमती भोसले यांनी ज्या महिला यातना भोगून देवत्वापर्यंत पोहचतात, त्यांना  देवमाता असे  संबोधन निश्‍चितच गौरवास्पद वाटेल, आणि समाजाचा या महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोणही बदलेल असे सांगितले.

एकल महिला दिनाच्या निमित्ताने गावातील शंभरहून अधिक महिलांची ग्रामपंचायतीत बैठक घेउन विधवा ऐवजी देवमाता  असे संबोधन्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. याच बरोबर एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाले तर तिचे सौभाग्य अलंकार उतरण्यास आपण पुढे येणार नाही आणि असे कुणी महिला करू लागली तर निश्‍चितच त्याला विरोध केला जाईल असे उपस्थित असलेल्या एकल महिलांनी मान्य केले.

गावात एकल महिलांना राष्ट्रीय सणावेळी होणार्‍या ध्वजवंदनामध्ये ध्वजारोहणाचा मानही दिला जातो. गावात ग्रामपंचायतीसह  जिल्हा परिषदेच्या दोन शाळा, दोन अंगणवाडी, एक  माध्यमिक शाळा आहे. या ठिकाणी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन यावेळी ध्वजारोहण एकल महिलांच्या हस्तेच करण्यात येते. 

गावच्या सरपंच श्रीमती भोसले यांचे माहेर मसूर (ता. कराड) हे असून पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेउन पतीसह ऑस्ट्रेलिया, टांझानिया, दुबई आदी राष्ट्रात राहून आलेल्या आहेत. पती आणि मुलगी आजही दुबईमध्ये असून कुटुंब वारकरी संप्रदायातील असल्याने समाजासाठी काही तरी करण्याच्या हेतूने गावी आल्या. आणि अल्पावधीतच थेट सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.

विधवा या नावाने जर कुणी उल्लेख केला तर लैंगिक अत्याचाराहून अधिक वेदना महिलांच्या मनाला  होत असतात. जर त्यांच्या संबोधनात देवाचा उल्लेख झाला तर तिच्या यातना काही प्रमाणात कमी होतील, आणि समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोणही बदलेल या हेतूने विधवा ऐवजी देवमाता असा शब्द प्रयोग करण्याचा निर्णय आम्ही घेतला- सरपंच स्मिता भोसले