सांगली : सांगली जिल्ह्यातील उसउत्पादकांचे १८० कोटी रूपये साखर कारखान्याकडे थकित आहेत. कारखान्यांनी येत्या आठ दिवसात एफआरपीनुसार १८० कोटींचा भरणा केला नाही तर साखर आयुक्ताना संबंधित कारखान्यावर कारवाई करण्यास भाग पाडू असा असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना श्री. शेट्टी यांनी सांगितले, कारखाने बंद होउन दोन महिने झाले. मात्र, गाळप झाल्यानंतर १४ दिवसात उसाचे पैसे देणे कायद्याने बंधनकारक असतानाही अद्याप कारखान्यानी १८० कोटी रूपये थकवले आहेत. याचा साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू आहे. आता आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कारखान्यांनी उस उत्पादकांचे पैसे दिले नाहीत तर साखर आयुयतांकडे कारवाईसाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने भरपाई देण्याची घोषणाही केली आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात याबाबत काहीच हालचाल दिसत नाही.

शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा बदलला असला तरी या गावातील शेतकरी वाचले असले तरी अन्य ठिकाणचे शेतकरी यामध्ये अडकणार आहेत. समांतर मार्ग असताना शक्तीपीठाचा अट्टाहास का असा आमचा सवाल असून शक्तीपीठ महामार्गच रद्द करा अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठीचा लढा आमचा सुरूच राहील असा निर्वाळाही त्यांनी दिला.