सांगली :  उसदराबाबत कोणताही तोडगा न निघाल्याने गुरूवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेली बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी एफआरपीनुसार दर देण्याचे मान्य केले, मात्र शेतकरी संघटनांनी अमान्य करत प्रतिटन  ४५०० रूपये मिळाल्याविना गाळप सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतला, तर कारखानदार प्रतिनिधींनी विचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतली. उसदरांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू आहे.

या पाश्‍वर्र्भूमीवर जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि प्रशासन प्रमुख यांची संयुक्त बैठक बोलावली होती. खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक कोणत्याही निर्णयाविना स्थगित करण्यात आली. या बैठकीस प्रादेशिक सहसंचालक उज्वला पळसकर, जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी हेही उपस्थित होते. स्वाभिनानीशेतकरी संघटनेचे प्रतिनिधी संदीप राजोबा यांनी यंदाच्या हंगामात साखरेचे दर वाढले असून कारखान्यांना उसाला चांगला दर देणे शयय असल्याचे सांगत पहिला हप्ता म्हणून विनाकपात साडेचार हजार रूपये प्रतिटन देण्याची मागणी केली.

तर किसान सभेने साडेसात हजार रूपयांची मागणी केली. साखर कारखाना प्रतिनिधींनी साखरेचे किमान विक्री मूल्य वाढविल्याविना जादा दर देणे शक्य नसल्याचे सांगत एफआरपीनुसार एकरकमी दर देण्यास तयार असल्याचे सांगत जर शासनाने साखरेचे किमान विक्री मूल्य वाढविले तर उर्वरित रक्कम नंतरच्या हप्त्यात देण्याची तयारी दर्शवली. तथापि, चर्चेत शेतकरी प्रतिनिधींनी आक्रमक होत अशा चर्चेत आम्हाला रस  नसल्याचे सांगत बैठक सोडून जाण्याची तयारी दर्शवली. मात्र, खा. पाटील यांनी हस्तक्षेप करत साखर कारखानदारांना बाजूला जाउन चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले. कारखान्याकडून मात्र, एफआरपीनुसार एकरकमी पहिला हप्ता देण्याची तयारी दर्शवली असली तरी संघटनेने हे मान्य केले नाही.

उसदराबाबत चर्चा करण्यासाठी कारखान्याकडून दोन दिवसाची मुदत मागण्यात आली. मात्र, या कालावधीत कारखाने बंद ठेवावेत अशी मागणी स्वाभिमानीने केली. दरम्यान कोल्हापूर, कर्नाटकातील कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. सुरू असलेल्या कारखान्यांनीही कारखाने बंद ठेवावेत, मग रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनावले. यावेळी ज्या कारखान्यांनी गाळप केले आहे, मात्र, एफआरपीनुसार शेतकर्‍यांच्या नावे देयके १४ दिवसात दिली नाहीत अशा कारखान्यांना प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने नोटीसा काढाव्यात असे खासदार पाटील यांनी या वेळी सांगितले.