सांगली : माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून त्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले.

आमदार क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याविरोधात अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. लोकप्रतिनिधीने अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी असून, राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीविरोधात अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगला. त्यानंतर पुतळ्याचे दहन करून संघटनेच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार राजेश यांनी शेट्टी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करून माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा संघटनेच्या वतीने पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा, संजय बेले, विश्वास कोळी, मनोहर पाटील, अजित लांडे, दीपक फराटे, चंद्रकांत अडसूळ, मयूर पाटील, नटराज पाटील, शरद पाटील, श्रीधर पाटील, अवधूत पाटील. संतोष ढोले विनोद बेले व शेतकरी उपस्थित होते.