सांगली : बुधवारपासून शेतीसाठी पूर्ण दाबाने सलग आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन शुक्रवारी महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी आक्रमक कार्यकर्त्यांना दिले. उन्हाळ्यात कृषी पंपांना विज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आज वीज कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक देत दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर चढून कुलुप काढण्यास भाग पाडले.
शेतीसाठी आठ तास होत असलेला विद्युत पुरवठ्यामध्ये दोन तासाची कपात केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे आता हाता तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या ४० अंश सेल्सिअस तापमान असून या वातावरणामध्ये सुद्धा शेतकरी ऊस द्राक्ष केळी भाजीपाला व अन्य पिके जगवत आहे तसेच सोयाबीनची पेरणी व टोकन सुरू आहे. अशा स्थितीत विद्युत पुरवठा हा तात्काळ पूर्वीप्रमाणे आठ तासात करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज तसेच महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप घालून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कार्यकर्त्यांनी गेटवर चढून आंदोलन करण्यास सुरुवात केली व गेट उघडण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांच्या घोषणांनी महावितरणचा परिसर दणाणून गेला. दोन तास शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता .
संदीप राजोबा यांनी अधीक्षक अभियंता आशिष मेहता यांना निवेदन दिले. मेहता यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली व बुधवारपर्यंत पूर्ण क्षमतेने आठ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानीचे संदीप राजोबा, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, शिक्षक नेते विश्वनाथ मिरजकर, संजय बेले, महादेव कोरे, बाबा सांद्रे, संजय खोलखुंबे, सुरेश वसगडे, विश्वास कोळी, मयूर पाटील, अनिल राजोबा, मनोहर पाटील, धन्यकुमार पाटील आदींसह कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.
