सांगली : तासगाव येथील रुग्णालयातून नवजात बालकाचे अपहरण केल्याप्रकरणी नर्स असलेल्या स्वाती छबुराव माने ऊर्फ लक्ष्मी मच्छींद्र पवार (३८, रा. रामानंदनगर, किर्लोस्करवाडी, ता. पलूस) हिला सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सरस्वती आनंद रुग्णालय, तासगाव येथे २२ जुलै २०२२ रोजी एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. २३ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता तिने मुलाला जन्म दिला. याच रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या आरोपीने बाळाची काळजी घेते आणि डॉक्टरांना दाखवून आणते, असे सांगून नवजात बालकाला पिशवीत ठेवून रुग्णालयातून नेले.
बाळ बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. बाळाच्या आजीने तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रुग्णालयासमोरील मेडिकल दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी पिशवी घेऊन जात असल्याचे दिसून आले. तसेच आरोपी ज्या रिक्षातून गेली, त्या रिक्षाचालकाकडे चौकशी केली असता पिशवीतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे त्याने सांगितले.
यानंतर पोलिसांनी रिक्षा मालकाच्या मदतीने शोधमोहीम राबवली. आरोपी तिच्या पतीसह घरात नवजात बालकासोबत आढळून आली. बालकाच्या पायाला रुग्णालयातील टॅग व चिकटपट्टी होती. त्यावर आईचे नाव, डॉक्टरांचे नाव, जन्मतारीख आणि जन्मवेळ नमूद होती. त्यामुळे अपहरणाचा प्रकार स्पष्ट झाला.पोलिसांनी बाळाच्या आई-वडिलांचे आणि बालकाचे रक्ताचे नमुने घेऊन डीएनए तपासणीसाठी कोल्हापूर येथील न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठवले. अहवालात बालक हे त्याच दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले. तपास पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक एस. एन. गुरव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. बालकाची आई, आजी आणि रुग्णालयातील डॉक्टर अंजली विश्वनाथ पाटील यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सीसीटीव्ही फुटेज, रिक्षा मालकाची साक्ष आणि आरोपीकडून बालकाची झालेली सुटका यासह अन्य पुराव्यांचा न्यायालयाने विचार केला.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता माधव कुलकर्णी आणि आरती आनंद देशपांडे (सातविलकर) यांनी काम पाहिले.
