सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने मोठा गोंधळ झाला.डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सर्वसाधारण सभेत घोषणाबाजी, फलकबाजी आणि व्यासपीठाकडे जाण्यावरून झालेल्या वादामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. विरोधकांच्या घोषणांना सत्ताधारी गटाच्या समर्थकांनीही प्रति घोषणांनी प्रत्युत्तर दिले. या गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषय मंजूर करण्यात आले.

बँकेच्या सभासदांकडून आकारण्यात येणारी मासिक वर्गणी १ हजार ३०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सभासदाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मृत संजीवनी’ योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभासदाचे निधन झाल्यास ३० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एकीकडे सभेत असे सभासदहिताचे निर्णय घेतल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला, तर दुसरीकडे विरोधकांनी सभेचे कामकाज नियमानुसार झाले नसल्याचा आरोप केला. ‘शिक्षक बँक आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘सत्ताधारी तुपाशी, सभासद उपाशी’, ‘बँकेची जुनी इमारत विकू देणार नाही’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.

दरम्यान, अवघ्या अर्ध्यातासात ही सभा आटोपती घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष अशोक घागरे होते. उपाध्यक्ष कृष्णा पोळ, संचालक रुपाली गुरव, संजय महिंद, अनिता काटे, फत्तू नदाफ, मिलन नागणे, नितीन चव्हाण, अमोल शिंदे, अमोल माने, राहुल पाटणे, सचिन खरमाटे, शिवाजी जाधव, अजितराव पाटील, गांधी चौगुले, शरद चव्हाण, सत्ताधारी स्वाभिमानी मंडळाचे नेते अविनाश गुरव आदी उपस्थित होते.

दरम्यान, विरोधी पुरोगामी सेवा मंडळाने सभा बेकायदा असल्याचे सांगून जुनी इमारत विकू देणार नाही प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला, तर माजी अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सभेत सभासदांच्या प्रश्नांना भिडण्याची ताकद सत्ताधाऱ्यांकडे नसल्याने नवीन सभासद व्यासपीठासमोर अगोदरच बसवून सभा गुंडाळली असल्याचा आरोप केला.