सांगली : खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात झालेल्या बस अपघातात गंभीर जखमी झालेल्या महाविद्यालयीन युवतीचा शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे. तर या अपघातात दोन्ही बसमधील चालक, वाहकासह ३५ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखाची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली असून जखमींवरील उपचाराचा खर्चही शासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी आज दिली.
विट्याहून भिवघाटला निघालेली बस (एमएच १४ बीटी ३२५५) आणि विजयपूरहून मेढा (जि. सातारा) निघालेली बस (एमएच १४ बीटी ४२७०) या दोन बसची रेणावी घाटात वळणावर धडक झाली. या अपघातात नंदाबाई हरिदास त्रिंबके (वय ६० रा. खानापूर) आणि धोंडीराम लक्ष्मण पाटील (वय ८० रा. सासवडे, जि. सातारा )या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही बसच्या चालक, वाहकासह ३५ प्रवासी जखमी झाले. जखमींना सांगली, विटा, कराड येथील वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
विटा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेली महाविद्यालयात शिक्षण घेणारी तरूणी साक्षी पवार (वय १८, रा. ऐनवाडी) हिचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या तीन झाली आहे. या अपघातात अन्य ३५ जण जखमी झाले असून यापैकी १५ जणांची प्रक्रृर्ती अद्याप चिंताजनक आहे. तर अन्य जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच आ. बाबर यांच्यासह विट्यातील अनेक तरूणांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. अपघातात दोन्ही बस एकमेकांच्यात घुसल्या होत्या. पत्रा कापून जेसीबीच्या मदतीने बस विलग करण्यात आले. अपघात ग्रस्तांना मदत करण्यात कोणतीही उणिव भासू दिली जाणार नाही असे आ. बाबर यांनी सांगितले. अपघातानंतर आ. बाबर यांनी तात्काळ परिवहन मंत्री सरनाईक यांच्याशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना मदत करण्याची विनंती केली. मृतांना दहा लाख रूपये आणि जखमी प्रवाशांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याचे मंत्री सरनाईक यांनी ग्वाही दिली असल्याचे आ. बाबर यांनी सांगितले.
दरम्यान, या अपघात प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात विजयपूर मेढा बसचा चालक किशोर शांताराम तरडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
