सांगली : जत, मिरज व तासगाव तालुक्याला वादळीवार्‍यासह झालेल्या वळीवांने दैना उडवली असून दीडशेहून अधिक घरांचे छत उडून गेले असून खलाटी (ता. जत) मधील वस्तीवरील घरावरील पत्र्यांचे छत पाळण्यासह उडून दूर पडल्याने एका  नउ  महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. मिरज पूर्व भाग व तासगाव तालुक्यात वादळी वारे आणि वळीवाने द्राक्ष, केळी, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या वादळी वार्‍यांने जत, मिरज व तासगाव तालुक्यात थैमान घातले होते. वार्‍याचा वेगही ताशी ४० ते  ५० किलोमीटर होता. रानवस्तीवर असलेल्या, एकल असलेल्या घरांचे यामुळे मोठे नुकसान झाले असून छताखालील लोखंडी अँगलसह  पत्रे  वादळाने उडून दूरवर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. जत तालुक्यातील खलाटीचे माजी सरपंच लक्ष्मण पाटील यांनी रानवस्तीसह एकाकी असलेल्या पत्र्याच्या घराचे छत उडून पडण्याच्या घटना घडल्या असल्याचे संगितले , तर पत्रा उडाल्यानंतर विटाच्या भिंतीही कोसळल्या आहेत.

खलाटी (ता. जत) येथील शेजूळ वस्तीवरील आनंदा शेजूळ यांच्या घराचे पत्रे तर उडालेच पण पत्र्याखाली असलेले लोखंडी अँगलसह बांधलेला पाळणाही दूरवर उडून पडला. यावेळी पाळण्यात नउ महिन्याचा श्रीवर्धन शेजुळ हे बाळ होते. पाळण्यासह अँगल दूर जाउन पाळण्यात झोपलेले बाळ बाहेर फेकले गेले. यात बाळाचा दुर्दैवी अंत झाला.  

सांगली जिल्ह्यात जत, तासगाव आणि मिरज तालुक्याला वादळी वार्‍याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे दीडशेहून अधिक घरांचे, गोट्यांचे, शेडचे पत्रे व कौल उडून गेली आहे. यामुळे दोन जण जखमी देखील झाले आहेत. जत तालुययातील कुणीकोनूर सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वार्‍याने घरांचा मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास १०० हुन अधिक घरे, गोट्यांचे छत उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळल्या आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले असून अनेक रस्त्यांवरील झाड देखील उन्मळून पडले आहेत.

मिरज तालुक्यातील पूर्वभागाला देखील वादळी वार्‍याचा मोठा फटका बसला आहे, खटाव, बेळंकी, लिंगनूर, सलगरे सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वार्‍याने नुकसान झाले आहे. तर तासगाव तालुक्यातील सावळज, जरंडी परिसरात वादळाने द्राक्ष, केळी व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी गारपीटही झाली. यामुळे द्राक्षाची पाने फाटली आहेत, तर नुकतीच  एप्रिल छाटणी झालेल्या वेलीचे कोवळे कोंब तुटून पडले आहेत. वादळी वार्‍यांने काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने, झाडाच्या  फांद्या तुटून पडल्याने वीज पुरवठा बंद आहे. आज दिवसभर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे वीज वितरण कंपनीचे प्रयत्न सुरू होते.