सांगली : ऑक्टोबर हिटचा अनुभव सुरू असतानाच शनिवारी पहाटे विटा परिसरात जलधारा कोसळल्या. मध्यम स्वरूपाचा पावसाने हजेरी लावल्याने सुखद गारवा हवेत पसरला. या पावसानंतर जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान राहिले. मात्र,  पावसाची शक्यता वाटत असताना केवळ उष्माच अधिक जाणवत होता.

आज मध्यरात्री दोन ते अडीच या दरम्यान, विटा शहरासह रेणावी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाउस झाला. या पावसाने पेरणी झालेल्या रानात पाणी साचले असून पेरणीसाठी तयार करण्यात आलेल्या सरीमध्ये पावसाचे पाणी साचले. या पावसाने पेरणी झालेल्या रब्बी पिकांना  दिलासा मिळाला असून उगवून आलेल्या शाळू पिकाच्या वाढीस हा पाउस पोषक ठरला आहे. फळछाटणी झालेल्या द्राक्ष बागांना या पावसाने एक आठवड्याचे पाणी दिल्यासारखा परिणाम झाला आहे.

तथापि, हा पाउस सार्वत्रिक झालेला नाही. रेणावीपासून काही अंतरावर असलेल्या खानापूर भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जिल्ह्याच्या  अन्य भागात रब्बी ज्वारीची पेरणीही पावसाअभावी खोळंबली असून द्राक्ष बागाच्या फळछाटणीची कामेही पाण्याअभावी रेंगाळली आहेत.