सांगली : विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून सांगली विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक नावे कमी झाली आहेत. जिल्ह्याची मतदार संख्या आता २१ लाख ९१ हजार ७० झाली असून ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा मतदारांनी नोंद करण्यासाठी प्रपत्र भरून द्यावे लागणार आहे. मतदारांनी आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी असे आवाहन जिल्हा  निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

मतदार पुनरिक्षण मोहिमअंतर्गत मतदारांची खातर जमा करण्यात आली असून ज्यांची माहिती उपलब्ध झालेली नाही अशी ३ लाख ८२ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पुनरिक्षण मोहिमेनंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली. मतदार यादीत नाव जर नसेल तर योग्य त्या पुराव्यानिशी मतदान अधिकार्‍यांकडे अपिल करता येणार असून यासाठी वगळण्यात आलेल्या मतदारांना नोटीसा पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ निहाय वगळलेले मतदार असे मिरज ५४ हजार ९५६, सांगली ९० हजार ६५८, ईश्‍वरपूर ४१ हजार ३२२, शिराळा ३१ हजार ९४३, पलूस-कडेगाव ३६ हजार ६९०, खानापूर ४४ हजार ८१६, तासगाव-कवठेमहांकाळ ४२ हजार ६७६ आणि जत ३७ हजार १५२.

मतदारांची प्रारूप यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांचे कार्यालय व सर्व पदनिर्देशित ठिकाणी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  

या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरुन मतदार नोंदणी करावी. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरुन आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येईल आणि मतदार यादीमध्ये दुरुस्ती देखील करुन घेता येईल.   मतदार यादीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीत मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल. तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी दिली.