सांगली: वाळवा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या कोल्ह्याने नागरिकांवर हल्ले करत दहशत निर्माण केली होती. या हल्ल्यांमध्ये एकूण १५ जण जखमी झाले असून सर्व जखमींवर ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी एका मेंढपाळाने प्रतिहल्ला करत संबंधित कोल्ह्याला ठार केले, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नवे व जुने खेड, बनेवाडी परिसरात कोल्हा अचानक लोकांवर झडप घालत असल्याच्या घटना शुक्रवारपासून घडू लागल्या. शेतात काम करणारे शेतकरी, रस्त्याने जाणारे नागरिक तसेच मेंढपाळांवर कोल्ह्याने हल्ले केले. काहींना हात, पाय आणि पोटावर चावे घेतल्याने जखमा झाल्या. सलग हल्ल्यांमुळे गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

शनिवारी सकाळी सहा वाजता फिरायला गेलेल्या प्रकाश चव्हाण यांच्यावर उसाच्या फडातून अचानक बाहेर येत हल्ला केला. त्यांच्या मांडीचा लचका तोडून पलायन केले. यानंतर शेतात वस्ती असलेले मेंढपाळ तानाजी कटरे व विशाल कुकडे यांच्यावर कोल्ह्याने हल्ला केला. कुकडे यांनी हातातील कुराडीने त्याच्यावर प्रतिहल्ला केला. त्यात कोल्हा ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृत कोल्ह्याचा ताबा घेतला. जखमींना तातडीने ईश्वरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रेबीज प्रतिबंधक लसीकरणासह उपचार सुरू आहेत. नागरिकांना कोणत्याही वन्य प्राण्याच्या हालचाली दिसल्यास त्याच्या जवळ न जाण्याचे आणि तत्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

दरम्यान, वनविभागाकडून परिसरात पाहणी सुरू असून आणखी वन्य प्राणी आढळतात का याची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.