सांगली : तीन मुलीच आहेत, मुलगा नाही, या कारणावरून तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिचा बांबूने मारहाण करत खून करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कुमार भीमराव जाधव असे आरोपीचे नाव असून, त्याला दहा हजार रुपये दंड आणि पैशांसाठी छळ केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. एस. काकडे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सुनंदा कुमार जाधव (वय ३०) यांचा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पती कुमार जाधव याने बांबूने मारहाण करून खून केला होता. तीन मुलीच असून मुलगा नाही, या कारणावरून तसेच माहेरून पैसे आणण्याच्या मागणीवरून कुमार हा सुनंदा यांचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ करत होता.
अखेर या छळातूनच त्याने पत्नीचा खून केला. या घटनेनंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान आरोपीविरुद्ध पंढरपूर पोलीस ठाण्यातही मृत सुनंदा यांचा छळ होत असल्याबाबत तक्रार दाखल असल्याची बाब समोर आली.
न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोपी कुमार जाधव याला दोषी ठरवले. खुनाच्या गुन्ह्याबद्दल जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी, तर पैशांसाठी छळ केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.
