सांगली : उद्या गुरूवारी सांगलीत शून्य सावलीचा दिवस असून यावेळी सावली आपली साथ सोडणार असल्याच्या घटनेची अनुभूती घेता येईल असे खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. सुनील माने यांनी सांगितले. गुरूवारी दुपारी १२ वाजून २८ मिनीटांनी शून्य सावलीचा योग असल्याचे त्यांनी सांगितले.
शून्य सावलीचा वैज्ञानिक अनुभव नागरिकांना सांगली जिल्ह्यात गुरुवारी ७ मे पासून शनिवारी ९ मे पर्यंत वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिवशी मध्यान्ही म्हणजे ठीक १२ वाजून २८ मिनिटांनी ५२ सेकंदासाठी घेता येणार असल्याचे डॉ. माने यांनी सांगितले.
पृथ्वी स्वत।भोवती परिभ्रमण करत असताना ती सूर्याभोवतीही फिरते. परंतु पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून, तो २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळेंच पृथ्वी परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायण होते. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तरेकडे असतो.
एखाद्या अक्षांशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येतो. कर्कवृत्त आणि मकरवृत्तामध्ये असणार्या सर्व भूभागावर उत्तरायण व दक्षिणायन होताना सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या खाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, असे डॉ. माने यांनी सांगितले.
शून्य सावली दिवसाचा अनुभव सांगली जिल्ह्यातील सांगली सह मिरज, वाळवा,कवठेमहांकाळ, शिराळा येथे ७ मे रोजी तर ८ मे रोजी तासगाव, जत, पलूस, खानापूर व ९ मे रोजी कडेगांव, आटपाडी येथे शून्य सावली दिवस अनुभवायला मिळणार आहे.
