सांगली : जिल्हा परिषदेच्या ६१ गटात आणि दहा पंचायत समितीच्या १२२ गणामध्ये आज सकाळी मतदान सुरु झाले. स्थानिक पातळीवरील निवडडणूक असल्याने मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. पहिल्या दोन तासात ६ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
काही मतदान केंद्रावर मंत्रयंत्र सुरु होण्यात अडथळे निर्माण झाले होते. हरिपूर येथील एका केंद्रावर मंत्रयंत्र सुरु झाल्याने मतदार परत गेले. मात्र दुसरे यंत्र ठेवून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली. मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी मतदारांना मतचिठ्ठी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे १८ लाख मतदारांसाठी २ हजार ३९ केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ८ हजार ९७९ कर्मचारी आणि २४८ विभाग प्रमुख यांची नियुक्त करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्ह्यातील सुमारे दोन हजार कर्मचारी अपुरे पडत असल्याने नांदेडहून गृहरक्षक दलाचे जवान आणि सोलापूर शहर पोलीस आयुक्त कार्यालयातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली आहे. त्यांनाही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. मतदान केंद्राशिवाय पोलीसांची फिरती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुका – १५२, जत तालुका – २९२, खानापूर तालुका – १३०, कडेगाव तालुका – १४८, तासगाव तालुका – २०१, कवठेमहांकाळ तालुका -१३०, पलूस तालुका – १२९, वाळवा तालुका – ३६०, शिराळा तालुका – १७१, मिरज तालुका – ३२६.
