सांगली : सांगली जिल्हा परिषदेत महायुतीला पराभूत करत महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संगीता पाटील व उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. त्यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि हिम्मत जाधव यांचा ३४ विरूध्द २५ मतांनी पराभव केला. निवडीवेळी शिवसेना शिंदे पक्षाचे दोन सदस्य गैरहजर राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन सदस्यांनी भाजप युतीला मतदान केल्याने सहा सदस्यांच्या गटात फूट पडल्याचे समोर आले.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय डाचपेचावर मात करत मिनी मंत्रालय म्हणजेच जिल्हा परिषदेवर भाजपेतर पक्षाचा झेंडा रोवला आहे.
जिल्हा परिषदेचे निवडणूक निकाल ९ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर आज अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडण्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली. अध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या डॉ. शीतल बाबर, प्रतिमा पाटील व श्रीमती मासाळ यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी श्री. लाड, जाधव, विद्या कुंभार यांनी उमेदवारी दाखल केली होती. मुदतीत काहींनी उमेदवारी मागे घेतल्याने अध्यक्षपदासाठी श्रीमती पाटील व मासाळ आणि उपाध्यक्ष पदासाठी लाड आणि जाधव यांच्यात लढत झाली.
प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या श्रीमती पाटील व काँग्रेसचे लाड यांना ३४ तर विरोधी श्रीमती मासाळ व जाधव यांना २५ मते मिळाली. यामुळे अध्यक्षपदी श्रीमती पाटील व उपाध्यक्षपदी श्री. लाड यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. ६१ सदस्यांच्या सभागृहात महाविकास आघाडीने ३४ मते घेउन बहुमत सिध्द केले.
रात्री झालेल्या घडामोडीनंतर माजी खासदार संजयकाका पाटील समर्थक राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या गळाला लागल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांनी भाजप युतीला मतदान केले. तर शिवसेना शिंदे गटाचे दोनसदस्य मतदानास गैरहजर राहिले. जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ मित्रपक्षाच्या दोन सदस्यांसह १८ होते. त्यांना शिवसेनेच्या सदस्यांची ५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची दोन अशी २५ मते मिळाली. तर महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १८, काँग्रेसचे ११ आणि शिवसेना ठाकरे गटाचे १ या सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार सदस्य अशी ३४ मते मिळाली.
निवडीनंतर आ. पाटील, आ.डॉ. कदम, खासदार पाटील यांच्यासह माजी आमदार विलासराव जगताप, अजितराव घोरपडे आदींनी जिल्हा परिषदेच्या वसंतदादा सभागृहात उपस्थित राहून नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होताच, जिल्हा परिषदेबाहेर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर गुलालाची उधळण करत फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
