सांगली : सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ निवडणूक विभाग व १० पंचायत समितीच्या १२२ निर्वाचन गणांसाठी शनिवारी सरासरी ६९.७६ टक्के मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी उद्या सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकूण १९१ टेबलवर १२२ फेर्‍यांमध्ये होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीचा निकाल दुपारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

शनिवारी जिल्हा परिषदेचे  ६१ आणि पंचायत समितीचे १२२ सदस्य निवडण्यासाठी जिल्ह्यातील १८ लाख १८ हजार ७४४ मतदारापैकी १२ लाख ६८ हजार ८५१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीसाठी एक अशी दोन मते देण्याचा अधिकार होता. तालुकानिहाय झालेले मतदान असे आटपाडी ७३.४१, जत ६७.३९, खानापूर ६७.२९, कडेगाव ७१.५६, तासगाव ६६.५७, कवठेमहांकाळ ६५.९३, पलूस ७५.७५, वाळवा ७४.७१, शिराळा ७०.२० आणि मिरज ६६.७१ टक्के. जिल्ह्यात सरासरी ६९.७६ टक्के मतदान झाले.

सोमवारी तालुकानिहाय मतमोजणी होणार असून यासाठी निश्‍चित करण्यात आलेली टेबल संख्या व फेर्‍यांची संख्या अशी आटपाडी – १८ टेबल, १२ फेर्‍या, जत – २७ टेबल, १३ फेर्‍या, खानापूर – १६ टेबल ९ फेर्‍या, कडेगाव – १६ टेबल, ११ फेर्‍या, तासगाव – २० टेबल, १२ फेर्‍या, कवठेमहांकाळ – १६ टेबल, ९ फेर्‍या, पलूस – १४ टेबल, ९ फेर्‍या, वाळवा – २२ टेबल, १९ फेर्‍या, शिराळा – २० टेबल, ९ फेर्‍या, मिरज – २२ टेबल, १९ फेर्‍या.

मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार असून मतमोजणी कर्मचार्‍यांना सकाळी आठ वाजता मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिले आहेत. मतमोजणी केेद्रावर भ्रमणध्वनी व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणण्यास मनाई केली असून ओळखपत्राविना प्रवेश नाकारण्यात येणार असल्याच्या सक्तसूचना  देण्यात आल्या आहेत.

मिरज तालुक्यातील मतमोजणी वैरण बाजार येथील नवीन शासकीय गोदामात होणार आहे. यामुळे हा रस्ता वाहतूक शाखेने उद्या सायंकाळपर्यंत वाहतुकीस बंद ठेवला असून मतमोजणी केंद्रावर जाणार्‍यासाठी मिरज हायस्कूलमध्ये अस्थायी वाहनतळ करण्यात आला आहे.

ग्रामीण भागात प्रचंड उत्सुकता लागून राहिेलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत  गुलाल कुणाचा याचा निर्णय उद्या दुपारपर्यंत कळणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुक निकालाकडे सर्वांचे लक्ष असले तरी मिरज, वाळवा आणि जत या तालुक्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे राजकीय धुरिणांची नजर लागली आहे.

गेल्या ९ वर्षानंतर शनिवारी जिल्हा  परिषद व पंचायत समितीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले. यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतिक्षा आहे. जिल्हा परिषदेची संख्या ६१ असून बहुमतासाठी ३१ जागांची गरज आहे. या निवडणुकीत भाजप ५० जागा  लढवत असून अन्य जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. तर या अन्य पक्ष शिवसेना शिंदे ३२, राष्ट्रवादी अजित पवार ३१, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ३२, काँग्रेस २५ जनसुराज्य ६, रयत क्रांती संघटना व  शिवसेना ठाकरे गट एक जागा लढवत आहे.

मिरज व वाळवा तालुक्यात प्रत्येकी ११ आणि जत तालुक्यात ९ जागा  आहेत. जिल्हा परिषदेत या तालुक्यातील प्रतिनिधींचे वर्चस्व राहणार असल्याने या तालुक्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात यावर पुढील राजकीय डावपेच आखले जातील. जिल्हा  परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित असल्याने येलूर, कुंडल, सलगरे, बागणी,  भाळवणी, निंबवडे, कासेगाव आदी ठिकाणच्या निकालाकडे सर्वाचे  लक्ष लागून राहिले आहे.

या निवडण्ाुकीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ही निवडणुक लढवली. खासदार विशाल पाटील, आ. सुरेश खाडे, आ. जयंत पाटील, आ. सुहास बाबर, आ. डॉ. विश्‍वजित कदम, आ. गोपीचंद पडळकर, आ. रोहित पाटील, आ. सत्यजित देशमुख आदीसह माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदींची प्रतिष्ठा पणाला लावणारी ही निवडणुक आहे.