सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दि.१८ मार्च रोजी होणार आहे. मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नूतन सदस्यांची बैठक बोलावण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत पेच  निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी विरूध्द महायुती यांच्यात बहुमतासाठी अन्य सदस्यांची गरज असल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील व  काँग्रेसचे आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी थांबा व पहाची भूमिका घेतली असल्याने अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागली आहे.

जिल्हा परिषदेच्या ६१ जागापैकी जनुसराज्य, रयत क्रांती संघटनेची प्रत्येकी एक  जागा धरून भाजप  महायुतीकडे १८ सदस्यांचे संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गट हा १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ११ तर शिवसेना ठाकरे गटाचे एक असे संख्याबळ ३० आहे. बहुमतासाठी महा विकास आघाडीला एका सदस्याची गरज आहे, तर महायुतीला १३ सदस्यांची गरज आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सहा तर शिवसेना शिंदे गटाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने आमच्या पक्षाला सव्वा वर्षे अध्यक्ष  पदाची संधी देणार्‍यासोबत आम्ही सत्तेत सहभागी होउ अशी भूमिका जाहीर केली आहे तर शिवसेनेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निर्णय सोपवला आहे. यामुळे सत्तेचा पेच अद्याप सुटलेला नसला तरी आता अध्यक्ष  निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत.