सांगली : जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी पुढे सरसावली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांसह उद्या (मंगळवारी) दुपारी बैठक होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता संपादन करण्यासाठी भाजप नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा फारसी प्रगती साधू शकली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौर्यावर काल आले होते. यावेळी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेउन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा केली. मात्र, बहुमताचे गणित जुळण्याची चिन्हे दिसत नसल्याने ही भेट फारसी आशादायी ठरली नाही. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असून अंतिम क्षणी तोडगा निघू शकतो अशी आशा भाजपच्या गोटात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सांगितले, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला असून उद्या म्हणजे मंगळवारी दुपारी महाविकास आघाडीचे नेते आमदार जयंत पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत उमेदवारीबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, शिवाजीराव नाईक हेही उपस्थित राहणार आहेत.
आघाडीची सत्ता स्थापन होत असताना सहभागी सर्वच पक्षांचा सहभाग महत्वाचा असल्याने याबाबतही या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. अध्यक्ष पद राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर काँग्रेसला उपाध्यक्ष पद देण्याबाबत निर्णय होण्याची चिन्हे आहेत. यानुसार अध्यक्ष पदासाठी वाळवा तालुक्याला तर उपाध्यक्ष पद पलूस तालुक्याला दिले जाण्याची चिन्हे आहेत. यानुसार अध्यक्ष पदासाठी संगीता पाटील व संध्या पाटील यांची नावे चर्चेत असून उपाध्यक्ष पदासाठी ऋषिेकेश लाड यांच्या नावाची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या ६१ सदस्यांच्या सभागृहात महाविकास आघाडीचे ३० सदस्य असून बहुमतासाठी एका सदस्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहा सदस्यांच्या कल आघाडीकडे असून भाजप व मित्र पक्षाचे संख्याबळ १८ आहे, तर शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ ७ आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता संपादनाची आघाडीला जास्त अनुकूलता दिसत आहे.
