सांगली : एकमेकांना शह-काटशह कायम ठेवण्यासाठी उमेदवारीबाबतची उत्सुकता राजकीय पक्षांनी कायम राखली असताना बुधवारी अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत, ढोलताशांचा गजर करत मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केले.
सांगली जिल्ह परिषदेच्या ६१ गटासाठी आणि दहा पंचायत समितीच्या १२२ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर होईल या अपेक्षेने काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे टाळले होते. अखेर बंडखोरी टाळण्यासाठी राजकीय पक्षांनी ज्यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे त्यांच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म घरपोच केले.
यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून अखेरपर्यंत उमेदवारांची यादीच जाहीर करण्यात आली नाही. यामुळे महायुती व महाविकास आघाडी यांच्या उमेदवाराबाबतची उत्सुकता आजही कायम राहिली आहे. तर राजकीय पक्षाचे चिन्ह मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
भाजप महायुतीकडून जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ६१ जागासाठी आणि पंचायत समितीच्या १२२ जागासाठी उमेदवार निश्चित करून आज दुपारी संबंधित उमेदवाराच्या हाती पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या स्वाक्षरीचे एबी फॉर्म दिले. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीत आपल्या पक्षाचे म्हणजे हात आणि तुतारी एकमेकाविरूध्द येणार नाही अशा पध्दतीने उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने काही ठिकाणी महाविकास आघाडीशी जागा वाटपात तडजोडीची भूमिका स्वीकारत तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
येलूर (ता. वाळवा) गटातून जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडिक यांच्या पत्नी हर्षदा महाडिक यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय माधवी पडळकर यांनी निंबवडे (ता. आटपाडी) गटातून ढोलताशांच्या गजरात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शिवसेनेचे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांनी दिघंची गटातून कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावर ओबीसी राखीव गटातून उमेदवारी दाखल केली आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे चिरंजीव विराज नाईक यांनी मांगले जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. जयराज पाटील यांनी कामेरी गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, वाळवा तालुक्यातून महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जिल्हा परिषदेच्या दोन जागा व पंचायत समितीच्या सहा जागा लढवत आहे.
खानापूर तालुक्यातील भाळवणी गटातून शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या भावजय व विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या पत्नी डॉ. शीतल बाबर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. तर बागणी (ता. वाळवा) गटातून आमदार सदाभाऊ खोत यांच्या स्नुषा मोहिनी खोत, आणि कोकरूड गटातून भाजप आमदार सत्यजित देशमुख यांच्या कन्या साईतेजस्वी देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
