सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची याचा निर्णय मुंबईत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार आहे. सोमवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अध्यक्ष पदासाठी आग्रह धरला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या  उपस्थितीत मिरजेच्या शासकीय विश्रामधामवर ही बैठक पार पडली.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. तथापि, महाविकास आघाडी आणि महायुती सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. महाविकास आघाडीचे संख्याबळ ३० असून बहुमतासाठी एका मताची गरज आहे, तर भाजपकडे जनसुराज्य व रयत क्रांती या घटक पक्षासह संख्याबळ १८ आहे. त्यांना बहुमतासाठी महायुतीला १३ सदस्यांची गरज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ६ आणि शिवसेना शिंदे पक्षाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. यामुळे सत्ता स्थापनेत पेच निर्माण झाला आहे. एका मताची गरज असल्याने महाविकास आघाडीही सत्ता स्थापनेसाठी आग्रही झाली असून महायुतीतील घटक पक्षांशी संधान साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत आज मिरजेत बैठक पार  पडली. या बैठकीस शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तथा विट्याचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर लोकसत्ताशी बोलताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री. भोसले-पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तथापि, आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे आमच्या पक्षाला पहिल्यांदा एक वर्षासाठी अध्यक्ष  पदासाठी संधी मिळावी असा प्रस्ताव आम्ही दिला असून भाजप व शिवसेना नेत्यांनी याला अनुकूल  प्रतिसाद दिला  आहे. तथापि, याबाबत महायुतीचे नेते  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होउन अंतिम निर्णय  घेतला जाईल. येत्या दोन दिवसात मुंबईत ही बैठक होणार असून महायुतीची सत्ता स्थापन करण्याच्यादृष्टीने बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.