सांगली : पिक्चर अभी बाकी है असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीची रणनीती अंतिम क्षणी निश्चित केली जाईल असे मंगळवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर चार विषय समिती सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीतही चर्चेच्या फेर्या सुरू असून उमेदवार निश्चिती उद्याच केली जाणार आहे. शक्य तिथे बिब्बा घालण्याचा आ. जयंत पाटील यांचा इतिहास असल्याची टीकाही मंत्री पाटील यांनी यावेळी केली.
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी महाविकास आघाडीने महायुतीवर मात करत सत्ता स्थापन केल्यानंतर सभापती निवडीवेळी पुन्हा एकदा ताकद दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. उद्या बुधवारी विषय समितीच्या चार सभापतींची निवड केली जाणार असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आपले सदस्य सहलीवर धाडले आहेत. तर महायुतीचीही सभापती निवडीसाठी रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीस पालकमंत्री पाटील यांच्यासह पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, रयत क्रांतीचे आमदार सदाशिव खोत, जनसुराज्य शक्तीचे समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे संजयकाका पाटील, शिवसेना शिंदे गटाचे अमोल बाबर आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील म्हणाले, राजकारणात कधीही आशा सोडायची नसते. राजकारणात एकच स्थिती कायम कधीच राहत नाही. सभापती निवडीसाठी महायुतीच्या सर्व सदस्यांना सांगलीत बोलावण्यात आले असून सभापती निवडीवेळी पाठिंब्यासाठी बोलणी, गाठीभेटी अद्याप सुरू आहेत. सर्वच गोष्टी उघड सांगता येणार नाहीत. पिक्चर अभी बाकी है म्हणत या निवडीबाबतचे गूढ त्यांनी कायम ठेवले. सभापती निवडीसाठी उमेदवार देण्याबाबत सभागृहात जातांनाच आमची रणनीती ठरेल. ज्या सदस्यांची उमेदवारी दाखल करायची आहे त्यालाच त्याची पूर्व कल्पना जिल्हाध्यक्षाकडून दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गट महायुतीसोबत आहे. मात्र, दोन सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहिले याबाबत विचारले असता पालकमंत्री म्हणाले, आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्यात बिब्बा घालण्याचे काम आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.जिथे जिथे शक्य आहे तिथे बिब्बा टाकायचा हा त्यांचा इतिहास असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी ६१ सदस्यांच्या सभागृहात ३४ सदस्यांच्या पाठिंब्याने महाविकास आघाडीने जिल्हा परिषदेत सत्ता संपादन केली असून उद्या होणार्या सभापती निवडीवेळी पाठिंबा देणार्या सदस्यांची संख्या वाढविण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न आहेत. तर महायुतीनेही सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने राजकीय गूढ वाढले आहे.
महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी पाठिंबा देणार्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गटाला सभापती पदाची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर आमदार रोहित पाटील यांच्या गटालाही सभापती पदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सावित्री तमणगोंडा रविपाटील, स्नेहल मोरे, आमदार रोहित पाटील गटाकडून दादासाहेब कोळेकर, अर्जुन पाटील, संजय बनसोडे आणि शिवसेना शिंदे गटाकडून जयदीप भोसले, पृथ्वीराज पाटील यापैकी एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
