कोल्हापुरात दोन दशकांनंतर मंडलिक – महाडिक यांचे मनोमीलन

आगामी लोकसभा निवडणुकीला मंडलिक यांच्या मागे महाडिक हे राहतील, याचे संकेत मिळाले आहेत.

कोल्हापुरात दोन दशकांनंतर मंडलिक – महाडिक यांचे मनोमीलन

दयानंद लिपारे, लोकसत्ता

कोल्हापूर : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होऊ लागली आहे. दोन दशके संघर्ष करणारे संजय मंडलिक व धनंजय महाडिक यांचे राजकीय मनोमीलन होऊ घातले आहे. तिकडे शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.

सत्तांतरानंतराचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटत आहेत.  शिंदे यांना माजी राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार यांनी पाठिंबा दिला. पुढे दोन खासदारांनी ठाकरे यांच्यापासून फारकत घेतल्याने शिवसेना कमकुवत झाली आहे. यानंतर नवी राजकीय बांधणीही घडताना दिसत आहे. त्याचे स्वत: राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी सुतोवाच केले आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र ‘ करण्यापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी देवेंद्र फडणवीस व माझ्याशी चर्चा केली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. याचवेळी महाडिक यांनी मंडलिक यांच्यासोबत नवी राजकीय वाटचाल होणार असल्याचे संकेतही दिले आहे.

जुन्या संघर्षांला विराम

मंडलिक – महाडिक घराण्याचा संघर्ष तसाच जुना. गेल्या दोन दशकांपासूनचा. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी महादेवराव महाडिक यांना राजकारणापासून दूर करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यांच्या पश्चात संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली. तेव्हा धनंजय महाडिक यांनी त्यांचा पराभव केला. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत महाडिक यांच्यावर मात करून मंडलिक यांनी पराभवाचे उट्टे काढले होते. निवडणुकीनंतरही दोघांमधील संघर्ष धुमसत राहिला. अगदी महाडिक यांची राज्यसभेवर निवड झाल्यावर मंडलिक यांनी आपण केलेल्या विकासकामाचे श्रेय कोणी घेऊ नये, असे म्हणत महाडिक यांच्यावर निशाणा साधला होता. यावरून वादाला श्रेयवादाची झालर लागली होती. हा वाद पुढे तापत राहणार असे दिसत असताना मंडलिक यांनी शिंदे गटाशी जवळीक केली. आता महाडिक यांच्या विधानानुसार ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’  करण्यापूर्वी मंडलिक यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. ही बाब राजकीय फेरमांडणीच्या दृष्टीने उल्लेखनीय ठरली आहे. यातूनच दोन्ही घराण्यांचे राजकीय मनोमीलन होताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला मंडलिक यांच्या मागे महाडिक हे राहतील, याचे संकेत मिळाले आहेत.

आघाडीची कोंडी

ही नवी राजकीय मैत्री महाविकास आघाडीला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण अद्याप महाविकास आघाडीकडे उमेदवार निश्चित नाही. गेल्यावेळी काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मंडलिक यांच्या मागे ताकद लावून त्यांना निवडून आणले होते. त्यांचा मंडलिक हा उमेदवारीचा मुख्य आधार दुरावला आहे. नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागत असताना हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे आले आहे. पण खुद्द मुश्रीफ यांनीच लोकसभा निवडणूक लढवण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट करीत आपण पुन्हा कागलमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार याचा पेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासमोर असणार आहे.

हातकणंगलेत संघर्षांची नांदी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदे गटात प्रवेश केला असल्याने या गटाचे ते उमेदवार असतील. दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र  राहुल आवाडे यांनी व्यक्त केली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत राजू शेट्टी यांनीही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. शेट्टी नेमक्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
स्वाभिमान गहाण ठेवला नसेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन बोला – आदित्य ठाकरे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी