सातारा: ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात माण आणि खटाव तालुक्यात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी म्हसवड येथील बस स्थानक चौकात भाजप समर्थकांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून त्याचे दहन केले व जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला.
राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ माण आणि खटाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये भाजप व महायुतीतर्फे निषेध मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. म्हसवड येथील आंदोलनादरम्यान राऊत यांच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनात म्हसवड पालिकेच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, उपाध्यक्षा श्रीदेवी पिसे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, डॉ. प्रमोद गावडे, माण-खटाव ‘लाडकी बहीण’ योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व भाजप समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान बोलताना आमदार धैर्यशील कदम म्हणाले खासदार संजय राऊत हे महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत. त्यांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी मराठी माणसाची अस्मिता असलेली शिवसेना संपवण्याचे काम केले आहे. यापुढे आमच्या नेत्यांबद्दल असे बोलल्यास त्यांना दिसेल तिथे चप्पलेने मारू. म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर यांनी जनतेने राऊतांना त्यांची जागा दाखवून दिली असून यापुढे आमच्या नेत्यांविरोधात अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत,असा इशारा दिला. तसेच, पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सातत्याने बेताल वक्तव्ये करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्या उपस्थितीत मायणी पुसेसावळी कराड उत्तर पुसेगाव दहिवडी वडूज येथे आंदोलन करण्यात आले. आमदार धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली पुसेसावळी येथे मोर्चा काढण्यात आला. पुसेगाव चौकात निदर्शने करण्यात आली. वडूजमध्ये तर दहिवडीतील फलटण चौकात कार्यकर्त्यांनी एकत्र येत राऊतांच्या वक्तव्याचा धिक्कार केला.
सभ्य राजकारण आणि लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने या अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप आणि महायुतीच्या वतीने करण्यात आले.
