सांगली : माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून घरवापसीसाठी दि. ३० जूनचा मुहुर्त निश्‍चित केला आहे.सांगली लोकसभा मतदार संघातून दोन वेळा विजयी झालेले श्री. पाटील यांचा विशाल पाटील यांनी पराभव केल्याने तिसर्‍यांदा संसदेत जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. यानंतर त्यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, आमदार रोहित पाटील यांच्याकडून त्यांचा पराभव पत्करावा लागला. यानंतर काही काळ त्यांनी राजकीय विजनवासही पत्करला  होता. मात्र, नुकत्याच नगरपालिका निवडणुकीवेळी त्यांनी स्थानिक पातळीवर पॅनेल करून तासगाव नगरपालिका जिंकली. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही त्यांच्या गटाला चांगले यश मिळाले.

तथापि, गेल्या सहा महिन्यापासून त्यांचे भाजप प्रवेशाचे प्रयत्न सुरू होते. अखेर विधान परिषद निवडणूक प्रचारावेळी प्रदेशाध्यक्ष आ.चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले व जयप्रकाश गोरे यांच्यासमवेत  झालेल्या बैठकीत माजी खासदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.याबाबत श्री.पाटील यांच्याशी संपर्क साधला  असता त्यांनी सांगितले, विकास कामांना गती देण्यासाठीच आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असून दि. ३० जून रोजी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्यात येणार आहे.