सातारा : पंढरीच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा महामेळा म्हणजेच जगतगुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात ऐतिहासिक आणि धार्मिक फलटणनगरीत दाखल झाला. ‘माउली, माउली’चा अखंड जयघोष, टाळ-मृदंगाचा गजर आणि हजारो वारकऱ्यांच्या अलोट उत्साहाने संपूर्ण फलटण शहर आणि परिसर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.

तरडगाव येथील दिमाखदार रिंगण सोहळा आटोपून पालखी सोहळा फलटण शहराच्या वेशीवर पोहोचताच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन पालखीचे अत्यंत भावपूर्ण आणि भव्य स्वागत केले. रस्ते ठिकठिकाणी रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते. पालखी जिंती नाक्याहून मलटन, पाचबत्ती चौक मार्गे मुधोजी मनमोहन राजवाड्यासमोर आल्यानंतर पालखीचे स्वागत नाईक-निंबाळकर घराण्याच्यावतीने करण्यात आले.

पालखी सोहळा मुख्य मार्गाने मार्गस्थ होत असताना फलटणकरांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. अनेक सामाजिक संस्था आणि मंडळांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा-पाणी, अल्पोपहार, औषधोपचार आणि निवासाची उत्तम सोय करण्यात आली होती. फलटणच्या ऐतिहासिक विमानतळ मैदानावर आणि इतर नियोजित ठिकाणी पालखीचा मुक्काम असून, माउलींचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

तरडगाव येथील प्रस्थानानंतर हा सोहळा सुरवडी येथे न्याहरी, निंभोरे येथे दुपारचे जेवण व वडजल येथे विसावा घेवून व पालखी मार्गावरील गावोगावी झालेल्या स्वागताचा स्वीकार करून पालखी सोहळा लाखो विठ्ठल भक्तांसमवेत संध्याकाळी फलटण शहरात दाखल झाला. या सोहळ्याचे फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष समशेरशिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव, माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर, आमदार सचिन पाटील आदी मान्यवरांनी स्वागत केले.

वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी फलटण नगरपालिका, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने आणि तात्पुरत्या वैद्यकीय छावण्या उभारण्यात आल्या आहेत. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
आज रात्री फलटणच्या विमानतळावर विसावा घेतला. सायंकाळी समाज आरती झाली. रात्री उशिरापर्यंत जागरण, कीर्तन आणि हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे. शनिवारी सकाळी पालखी सोहळा बरडकडे मार्गस्थ होणार आहे. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव येथे विसावा घेवून हा सोहळा सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी दाखल होणार आहे.

तरडगाव पालखी मुक्कामाच्या दरम्यान विजेच्या खांबात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने वारकऱ्याला जोरदार धक्का बसला. यामध्ये एक वारकरी गंभीर जखमी झाला. त्याला तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

तरडगाव ते फलटण या मार्गावर सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात यंदा तरुण-तरुणींचा सहभाग लक्षणीय वाढलेला दिसून येत आहे. परंपरेने वारकरी संप्रदायात वयोवृद्धांचा अधिक सहभाग असायचा, मात्र बदलत्या काळात तरुणाईही भक्तिभावाने दिंडीत सहभागी होत असल्याचे चित्र दिसत आहे. दिंडीत चालत असताना युवक-युवती टाळ-मृदंगाच्या गजरात अभंग गात, विठ्ठलनामाचा जयघोष करत मार्गक्रमण करत आहेत. काही जण सेवाभावी उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असून वारकऱ्यांना पाणी, औषधे, तसेच अन्नदानाची सेवा देताना दिसत आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यात भक्तीबरोबरच सामाजिक जाणीवही वृद्धिंगत होत आहे.

तरुण पिढी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या सोहळ्याचा प्रसार करत असून, वारकरी परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. “ही केवळ यात्रा नसून, आत्मिक समाधान देणारा अनुभव आहे,” असे मत अनेक युवकांनी व्यक्त केले.
तरडगाव ते फलटण या टप्प्यातील दिंडी शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत असून, स्थानिक ग्रामस्थांकडून वारकऱ्यांचे उत्साहाने स्वागत केले जात आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सातारा जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे.