सातारा: ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदंगाचा गजर आणि अथांग भक्तीच्या सागरात न्हाऊन निघत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज दुपारी धर्मपुरी येथे सातारकरांचा निरोप घेत सोलापुरात प्रवेश केला. सातारा जिल्ह्यातील शेवटचा बरड मुक्काम आटोपून लाखो वारकऱ्यांसह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने आणि हजारो भाविकांनी या पालखी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात स्वागत केले.
’भाग गेला शीण गेला । अवघा झाला आनंद ॥पाहिले रूप पाऊल सरते । देहभाव तो हरपला ॥ ‘अभंग मुखी ठेवत लोणंद, तरडगाव ,फलटण ,बरड येथील तब्बल चार मुक्कामांचा त सातारकरांचा अगत्याचा पाहुणचार स्वीकारून, भक्तीमय प्रवास पूर्ण करत पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. साताऱ्याच्या सीमा ओलांडताना सातारकरांचे डोळे निरोपाने पाणावले होते, तर दुसरीकडे ‘आता पंढरी जवळ आली’ या आशेने वारकऱ्यांचा सगळा शीण एका झटक्यात नाहीसा झाला होता. त्यांच्या मुखी
ये गं ये गं विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥आस लागली दर्शनाची ।वाट पाहे पंढरीची ॥डोळे नीत वाहे पाणी । तुझी आठवण करूनी ॥ सातारकरांचा निरोप घेताना वारकऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले होते. पालखी सोहळ्याचा साताऱ्यातील निरोप हा वारकऱ्यांसाठी कमालीचा भावुक क्षण असतो. माऊलींची पालखी जेव्हा पुढे निघते, तेव्हा विरहाची आणि पंढरीच्या ओढीची एकच दाट भावना मनात दाटून येते. शनिवारी सायंकाळी बरड नगरीत विसावलेल्या माऊलींच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्यातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
आज पहाटे महापूजा आणि आरती झाल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरीच्या दिशेने रवाना झाला. सोलापूरच्या सीमेवर स्वागत करताना वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सातारा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी धन्यकुमार गोडसे, प्रांताधिकारी आणि तहसीलदार आदींनी परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्याची सूत्रे सोलापूर जिल्हा हद्दी वर पालकमंत्री जयकुमार गोरे,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , जिल्हाधिकारी एस . कार्तिकेन , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे सोपविली. यावेळी संपूर्ण परिसर ‘माऊली माऊली’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सोलापूर प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यावर पुष्पगुच्छी करण्यात आली. निरोप देताना वारकरी, सातारकर आणि प्रशासनाचे कंठ दाटून आले होते. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना पंढरी जवळ आल्याचा आनंद वारकऱ्यांच्या पावलांमध्ये दिसत आहे.
