सोलापूर: “शेगावीचा राणा माहेरी निघाला | संगे संत मेळा भजनी रंगला ||” अशा भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी महोत्सवासाठी मार्गस्थ झालेली श्री संत गजानन महाराजांची ५७ वी पायी पालखी १७ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता तामलवाडीमार्गे सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. पंढरीनाथाच्या दर्शनाची ओढ घेऊन शेगाव (बुलढाणा) येथून सुमारे ७५० किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या या सोहळ्याचे जिल्ह्यात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.
उळे गावात भक्तीचा महापूर; ५० वर्षांची परंपरा कायम
सोलापूर जिल्ह्यातील उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखीचा पहिला मुक्काम होता. ७०० हून अधिक वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उळे गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. फुलांचा वर्षाव आणि रांगोळ्यांच्या देखण्या पायघड्यांनी अवघे गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते.
वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून उळे गावकऱ्यांनी एकत्रितपणे महाप्रसादाची सोय केली. गावातील माता-भगिनींनी पहाटेपासूनच एकाच छताखाली शेकडो पोळ्या लाटल्या. चपाती, आमटी, भाजी आणि भात अशा सात्विक महाप्रसादाची तयारी करून गावाने ५० वर्षांहून अधिक काळाची आपली आदरातिथ्याची परंपरा आनंदाने जपली. केशरी फेट्यात सजलेल्या महाराजांच्या रजत मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा अलोट गर्दी केली होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, सामाजिक कार्यकर्त प्रशांत गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार किरण जमदाडे आदी स्वागतासाठी उपस्थित होते.
पाऊस घेऊन आले गजानन…
दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूरकरांना सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने सुखावले. गजानन महाराजांचा पालखी सोहळा उळे गावात मुक्कामी विसावला. त्यानंतर हरिपाठ व आरती होताच सर्वत्र जोरदार पाऊस झाला. गजानन महाराज पाऊस घेऊन आले… ही भावना त्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर होती.
अत्यंत शिस्तबद्ध सोहळा
या दिंडी सोहळ्यामध्ये संस्थानतर्फे ७०० ते ७५० वारकरी सहभागी आहेत. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ आणि खांद्यावर पताका घेऊन अत्यंत शिस्तीत ही दिंडी चालते. पालखी सोहळ्यासोबत संस्थानचे पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक, फिरते शौचालय आणि स्वच्छता दूतांची स्वतंत्र व्यवस्था आहे.
शनिवारी सोलापूर शहरात आगमन; दोन दिवस मुक्काम
शनिवारी (दि. १८) दुपारी १२ वाजता हा पालखी सोहळा सोलापूर शहरात प्रवेश करेल. पाणीगिरणी चौकात महानगरपालिकेतर्फे महापौर विनायक कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर पालखीचे स्वागत करतील. त्यानंतर सोहळा सम्राटनगर येथील सद्गुरू श्री प्रभाकर महाराज मठामध्ये येईल, जिथे दोन्ही संतांच्या पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा होईल. येथे वारकऱ्यांना पिठलं-भाकरीचा महाप्रसाद दिला जाईल. शनिवारी सायंकाळी पालखी रविवार पेठेतील कुचन हायस्कूलमध्ये (प्रशालेत) विसावणार आहे.
रविवार, १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता पालखी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात मुक्कामी येईल. मंदिर प्रमुख रूपेश जक्कल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दिवशी सुमारे ३० हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन आहे. तसेच, या दिवशी सात रस्ता येथे वारकऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंग, कपड्यांना इस्त्री करणे आणि चपला शिवून देणे अशा विविध सेवा पुरवण्यासाठी स्थानिक संस्था सक्रिय झाल्या आहेत.
