सोलापूर : ‘गण गण गणात बोते’ आणि ‘जय हरी विठ्ठल’चा अखंड जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेली संत गजानन महाराजांची पालखी १७ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी सोलापूरकर सज्ज झाले असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेगाव (बुलढाणा) येथून निघालेला हा पालखी सोहळा ७०० किलोमीटरचा पायी प्रवास करून, आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपूरमध्ये दाखल होतो. या सोहळ्यामध्ये संस्थानतर्फे अधिकृतपणे ७०० ते ७५० वारकरी (भजनी मंडळी) सहभागी असतात. दिंडी सोहळ्यामध्ये प्रामुख्याने पुरुष वारकरी असतात. पांढरा सदरा, धोतर किंवा विजार, डोक्यावर टोपी, गळ्यात टाळ आणि खांद्यावर पताका घेऊन अत्यंत शिस्तीत ही दिंडी चालते. पालखी सोहळ्यासोबत संस्थानचे स्वतःचे पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, डॉक्टरांचे पथक आणि फिरते शौचालय असते. विसावा व मुक्कामाच्या ठिकाणचा कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता दूत सेवाभावी कार्यकर्त्यांची स्वतंत्र व्यवस्था असते.

धाराशिव जिल्ह्यातून हा पालखी सोहळा १७ जुलै रोजी सायंकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर प्रशासन आणि नागरिकांतर्फे सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात येते. सोलापूर जिल्ह्यातील उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील पहिला मुक्काम असेल. १८ जुलै रोजी हा सोहळा सोलापूर शहरात प्रवेश करेल. महानगरपालिकेतर्फे शहरात सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार असून, सोलापूर शहरामध्ये पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम असणार आहे.

हेही वाचा

पालखी सोहळ्याचे वेळापत्रक

• १७ जुलै : सायंकाळी ४ वाजता तामलवाडीमार्गे पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होईल. पालखीचा मुक्काम उळे गावात असेल, जिथे ५० वर्षांहून अधिक काळापासून गावकऱ्यांतर्फे वारकऱ्यांची सेवा केली जाते.
• १८ जुलै : दुपारी १२ वाजता सम्राटनगर येथील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात पालखीचे आगमन होईल. दुपारचा महाप्रसाद मठामध्ये असेल. सायंकाळी पालखी रविवार पेठेतील कुचन प्रशालेत पोहोचेल, असे उदय वैद्य यांनी सांगितले.
• १९ जुलै : सकाळी १० वाजता पालखी सात रस्ता येथील उपलप मंगल कार्यालयात येईल. या दिवशी सुमारे ३० हजार भाविकांना महाप्रसाद देण्याचे नियोजन असल्याचे मंदिर प्रमुख रूपेश जक्कल यांनी सांगितले. याच दिवशी सात रस्ता येथे वारकऱ्यांसाठी मोफत दाढी-कटिंग, कपड्यांना इस्त्री करणे आणि चपला शिवून देणे यांसारख्या सेवा पुरवण्यासाठी विविध संस्था सक्रिय झाल्या आहेत.