सातारा : सहकाराचे मंदिर पक्षविरहित ठेवणाऱ्या आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजकीय जुगलबंदीसोबतच मिश्किल आणि दिलखुलास वातावरणाचा अनुभव उपस्थितांना मिळाला. ‘खासदार उदयनराजे भोसले अन् आमचं प्रेम अमर आहे. त्यांना बोलू शकणारा मी एकमेव माणूस आहे,’ अशी मिश्किल टिपणी विधान परिषदेचे माजी सभापती व बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी करताच संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.

​विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटची वार्षिक सभा असल्याने सर्वच संचालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सभेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब पाटील यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सभेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सर्व संचालकांचे आभार मानताना, ‘गेल्या पाच वर्षांत खासदार उदयनराजेंचा बँकेला कसलाच त्रास झाला नाही, उलट त्यांचे चांगले मार्गदर्शन लाभले,’ असा उल्लेख केला. डॉक्टर साहेबांच्या या वक्तव्यावर व्यासपीठावर बसलेल्या उदयनराजेंनी तात्काळ हात जोडले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

​‘अमरप्रेम’ कहाणी अन् कोपरखळ्या

तोच धागा पकडत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या खास शैलीत चिमटे काढण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, ‘. उदयनमहाराज, आपले दर्शन निदान त्रास देण्यासाठी तरी घडू नये, अशी माझी विनंती आहे. शेवटी उदयनराजेंना बोलू शकणारा मी एकमेव माणूस आहे, बाकी कोणी धाडस करणार नाही. कारण आमचं ‘अमरप्रेम’ आहे, त्याला काय करणार?” रामराजेंच्या या वक्तव्याने सभागृहात पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘माझे भाषण आता अशा वळणावर आले आहे की मी इथेच थांबतो,’अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

​ उदयनराजेंकडून पांढऱ्या चाफ्याचा दरवळ

सभेपूर्वी चौथ्या मजल्यावरील संचालक मंडळाच्या बैठकीत खा. उदयनराजे भोसले यांनी सर्व संचालकांना पांढऱ्या चाफ्याची फुले स्वतः भेट दिली. ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांना चाफ्याची फुले देऊन त्यांनी आशीर्वाद घेतले. उदयनराजेंच्या या आपुलकीमुळे सभागृहात चाफ्याचा सुवास आणि आपुलकीचा दरवळ पसरला होता.

​ शिवेंद्रसिंहराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा

निवडणुकीच्या तोंडावर भरलेल्या या शेवटच्या सभेला बँकेचे माजी अध्यक्ष,संचालक व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे पहिल्यांदाच अनुपस्थित राहिले. सर्वाधिक ठराव त्यांच्याकडे असतानाच्या या अनुपस्थितीबद्दल सभासदांमध्ये उलटसुलट चर्चा रंगली होती. तथापि, ते गोंदिया-गडचिरोली दौऱ्यावर असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत, असे त्यांच्या समर्थकांकडून स्पष्ट करण्यात आले.