सातारा: सातारा शहरानजीक असलेल्या ऐतिहासिक सातारा बोगदा परिसरात मध्यरात्री कौटुंबिक वादातून एका ३५ वर्षीय महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसर हादरून गेला आहे. सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५, रा. सातारा बोगदा परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांपासून चव्हाण दांपत्यामध्ये कौटुंबिक कारणांवरून सातत्याने वाद होत होते.
रविवारी मध्यरात्री याच वादाचा भडका उडाला. या रागाच्या भरात पती प्रदीप हणमंत चव्हाण याने पत्नी सुनिता यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुनिता चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. ऐन मध्यरात्री घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खून केल्यानंतर आरोपी पती प्रदीप चव्हाण हा घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत होता.
मात्र, पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत आणि तातडीने सूत्रे हलवून संशयित आरोपी प्रदीप चव्हाण याला काही तासांतच ताब्यात घेतले असून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कौटुंबिक वादाव्यतिरिक्त या हत्येमागे आणखी काही गंभीर कारण आहे का, याचा अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत
