सातारा : अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाइन माध्यमातून फसवून (डिजिटल अरेस्ट) डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बोगस कॉल सेंटरवर सातारा पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारास सातारा पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. बिपिन रामतीर्थ गुप्ता उर्फ बिपिन साहू (वय ३५, रा. गोविंदनगर, नाशिक.) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील ही सहावी अटक आहे.
स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकून १७ संशयितांना ताब्यात घेतले होते. यातील पाच जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाइल फोन आणि अमेरिकन नागरिकांचा डेटा समाविष्ट असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली होती.
या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमसुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवी वानखेडे, दीपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांचीही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. हे सर्व संशयित मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे आहेत.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सांगितले की, ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी’ या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू होते. नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.
पोलिसांच्या छाप्यात कॉल सेंटरमधून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक साहित्य, अमेरिकन नागरिकांचे संपर्क तपशील आणि २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली होती.
प्राथमिक तपासात फसवणुकीसाठी प्रामुख्याने डॉलर व्यवहारांचा वापर केला जात असल्याचे तपासात उघड झाले होते. छोट्या गावात असे कॉल सेंटर चालवत असताना कोणालाही संशय येऊ नये म्हणून कोरेगावची निवड करण्यात आली होती. पोलिसांनी पाच जणांना शनिवारी अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी चौकशी सुरू होती. मात्र या प्रकरणातला मुख्य सूत्रधार फरारी होता. त्याला शोधून नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत.
