सातारा : बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेळ्यांची चोरी करणाऱ्या एका सराईत टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या शेळ्या आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सहा लाख ४८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मनोज सुरेश जाधव, रमेश सुरेश पिटेकर, दत्तात्रय शामराव साळुंखे आणि मारुती सर्जेराव जाधव यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमठे येथील शेतकरी रामकृष्ण रघुनाथ दळवी यांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ४८ हजार रुपये किमतीच्या एकूण १९ शेळ्या गाडीतून चोरून नेल्या होत्या.
याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत तुकाराम हुले, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र एकनाथ पाटील, हेड कॉन्स्टेबल मिलिंद कुंभार, नीलेश गायकवाड, दीपककुमार मांडवे, प्रशांत चव्हाण, उत्तम कदम, सतीश पवार, केतन जाधव, अमोल कणसे, विशाल जाधव, समाधान जाधव, संजय जाधव आणि प्रदीप पवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयावरून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेल्या शेळ्यांसह गुन्ह्यात वापरलेली चार लाख रुपये किमतीची गाडी (एमएच १० बीआर ०२४०) जप्त केली आहे.
एसटी वाहक नशेत आढळला
सातारा एसटी स्टॅण्डमध्ये चार्जिंग पॉईंटच्या समोर पार्किंगमध्ये रविवारी दुपारी ठाणे आगाराचा वाहक बालाजी गंगाराम मानवते (वय ४०, रा. धाररोड, हनुमान मंदिराजवळ, आनंदनगर, परभणी) हा मद्य सेवन केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्यात चालक राजेंद्र जाधव याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा सहकारी वाहक बालाजी गंगाराम मानवते हा सातारा आगारातील चार्जिंग पॉईंटच्या समोर पार्किंगमध्ये लालपरी बसच्या खालच्या बाजूस झोपला होता, म्हणून त्यास राजेंद्र जाधव म्हणाला, ड्युटीला जायचे आहे. त्यावर मानवते म्हणाला, मला मळमळ होत आहे, असे अडखळत सांगू लागला, त्याच्या तोंडाचा उग्र वास येत होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास हवालदार मोरे करत आहेत.
