सातारा : पतसंस्थेचे कर्ज मंजूर झाल्यानंतर जमिनीवर बोजा नोंदवण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. विलास पांडुरंग नागरगोजे (वय ५१, तलाठी) आणि जगन्नाथ नामदेव उमापे (वय ४९, कोतवाल) अशी आरोपींची नावे आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ६३ वर्षीय शेतकरी तक्रारदार यांना एका पतसंस्थेकडून ५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले होते. या कर्जाचा सातबारा उताऱ्यावर बोजा नोंदवण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला चार हजार रुपयांची लाच मागितली होती. ३१ जुलै रोजी झालेल्या पडताळणीत तडजोडीअंती तीन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

​त्यानुसार, आज मंगळवारी ( दि ४ ) पुसेसावळी येथील मंडल व तलाठी कार्यालय इमारतीच्या जिन्यात सापळा रचण्यात आला. यावेळी तलाठी नागरगोजे यांच्या सांगण्यावरून कोतवाल उमापे यांनी पंचांसमक्ष तीन हजार रुपये स्वीकारताच लाचलुचपत पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

​याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग साताऱ्याच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती शैला कोरडे व त्यांच्या पथकाने केली. महसूल विभागातील भ्रष्टाचारा विरोधात लाच लुचपत विभागाने आज ही धडक कारवाई केली.