सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी मृतदेह सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देताना अदलाबदली होण्याचा पुन्हा एकदा प्रकार घडल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले.

संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात धरणे आंदोलन केले. जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल होण्याचा या महिन्यातील हा दुसरा प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे यांनी गंभीर दखल घेत शंकर शिंदे आणि विशाल रावखंडे या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे.

सोनगरवाडी (ता. वाई) येथील आनंद ओव्हाळ (वय २६) यांनी विषप्राशन केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले, तर आरळे (ता. सातारा) येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) हे मागील तीन दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले.

दोन्ही मृतदेहांचे रात्रीच शवविच्छेदन करून ते सकाळी नातेवाईकांना देण्यात आले. सोनगिरवडी वाई येथील आनंद ओव्हाळ यांचा मृतदेह घरी आणून त्याच्यावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारापूर्वी मृत ओव्हाळ यांच्या आजीने नातवाचा चेहरा पाहायचा आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी हा आपल्या नातवाचा मृतदेह नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधला असता त्यांना मृतदेह पुन्हा साताऱ्याला घेऊन येण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाने खोमणे यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहाचे अदलाबदल झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी खोमणे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पेटवलेली चिता विझवून आणलेला मृतदेह परत रुग्णालयात आणण्यात आला. दुपारी त्यांच्या-त्यांच्या नातेवाईकांच्या योग्य मृतदेह ताब्यात देण्यात आल्यानंतर मृतांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण होते त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

या घटनेमुळे नातेवाईक आक्रमक झाले असून, चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात देण्यात आल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची खडाजंगी

सोनगीर वाडी येथील मृत्युमुखी पडलेल्या आनंद ओव्हाळच्या नातेवाईकांनी संबंधित प्रकाराबाबत संताप व्यक्त करत रुग्णालय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला. मृतदेहाचा चेहरा दाखवण्यात न आल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त करत संबंधित कर्मचाऱ्यांना ताबडतोब आमच्या समोर आणा, अशी मागणी केली.

जिल्हा रुग्णालयात दोन्हीकडच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमा झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा गंभीर प्रकार समोर येताच सातारा पोलीसही घटनास्थळी उपस्थित झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी या प्रकरणांस जबाबादार असलेल्या शंकर शिंदे आणि विशाल रावखंडे या दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले. तसेच याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.