सातारा : गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दुर्गम ‘उळुंब’ (ता. वाई) या गावी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मुक्काम केला. त्यांच्या साधेपणाने गावकरी मात्र चांगलेच भारावले. दुर्गम भागातील समस्या समजून घेणे त्या स्थानिक पातळीवरच सोडविणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीची तपासणी, प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

अनेकदा ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या छोट्या छोट्या समस्यांसाठी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी चकरा माराव्या लागतात. यावर उपाय म्हणून मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा वाई तालुक्याच्या अत्यंत दुर्गम व दऱ्याखोऱ्यांत वसलेल्या बलकवडी धरणाच्या शेजारील पुनर्वसित उळंब या गावी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः उळुंब गावी जात, तिथे मुक्काम करून जनतेशी थेट संवाद साधला. महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या विविध विभागांच्या स्थानिक तक्रारींवर थेट चर्चा करून अनेक समस्यांचा जागेवरच निपटारा केला.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी विशेष अतिथी (व्हीआयपी) संस्कृतीला फाटा देत जमिनीवर बसून रात्रीचे भोजन गावकऱ्यांसोबत केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने सर्वच गावकऱ्यांची मने जिंकली. अत्यंत दुर्गम असणाऱ्या गावात जिल्हाधिकाऱ्यांच्य मुक्कामी येण्याने लोकांमध्ये कुतूहल, औत्सुक्य आणि आनंद या सर्वच भावनांचा संगम पाहायला मिळाला.

जिल्हाधिकारी म्हणून असणारा सर्व डामडौल बाजूला सारत गावकऱ्यांमध्ये सहज मिसळणे आणि अत्यंत साधेपणाने त्यांच्यासोबत वावरणे आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेणे, या सर्वच गोष्टी गावकरी पहिल्यांदाच अनुभवत होते.

या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी गावात पॅडल बोट, जेट्टी, रेशनिंग कार्ड, फळबाग लागवडीसाठी प्राधान्य, पुनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, त्यांना जमिनीचे वाटप करून संबंधित दाखल्यांचे वाटप करावे, रुग्णवाहिका देण्यात यावी अशा सूचना केल्या.

गावकऱ्यांनी गावात कृषी पर्यटनाला चालना, मासेमारीला परवानगी, जंगली वृक्षांची लागवड, वन्य प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात. तसेच शाळेच्या वसतिगृहाला शासकीय स्तरावरून मदत, बोटिंगसाठी परवानगी, गोळेगाव, जोर, उळंब, गोळेवाडी या चार गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण होण्यासाठी शिबिर घ्यावे, उळुंबसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत सुरू करण्यात यावी, अशा मागण्या केल्या.

या दौऱ्यात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी अनेक शासकीय योजनांची पाहणी केली. या ग्रामदौऱ्यात मुक्कामाच्या वेळी प्रातांधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बोडके, पोलीस पाटील आदी सर्व उपस्थित होते.