सातारा: येथील नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी (दि. २) रात्री अकराच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसतिगृहातील एका चौकशीबद्दल प्रशासनाने पालकांना बोलावले, असे समजल्यावर भीती आणि मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे सातारा शहरात प्रचंड खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ अभाविपने आंदोलन केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील एका प्रकरणाची सध्या चौकशी सुरू होती. या प्रकरणी संबंधित विद्यार्थिनीला माहाविद्यालय प्रशासनाने तिच्या पालकांना बोलावून घेण्यास सांगितले होते. पालकांना सामोरे जाण्याच्या भीतीने संबंधित विद्यार्थिनी घाबरली तसेच ती मानसिक दडपणाखाली गेल्यावर मंगळवारी (दि. २) रात्री अकराच्या सुमारास तिने वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेचे महाविद्यालयीन वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी महाविद्यालय परिसरात जोरदार निदर्शने करत परिसर ढवळून काढला. विद्यार्थिनीच्या मृत्यूमागे महाविद्यालयातील शिक्षिका किंवा प्रशासनाचा मानसिक त्रास आणि दबाव होता का, याची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अभाविपने केली आहे.
संवेदनशील घटनेत प्रशासनाने अपेक्षित गांभीर्य न दाखवल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, विद्यार्थिनीच्या पालकांनी अद्याप कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नसून, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
