सातारा :​चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह शेतात फेकून देणाऱ्या पतीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि औंध पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोणतीही ओळख नसलेल्या या मृतदेहाचा सुगावा लावण्यासाठी तब्बल १२ दिवस शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत पोलिसांनी हे आव्हान पेलले. याप्रकरणी संशयित पतीला माळशिरस (जि. सोलापूर) येथून ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले आहे. राहुल संभाजी कोळी (वय ४० वर्षे राहणार- मांडवे ता. माळशिरस, जि. सोलापूर ) असे अटक केलेल्या संशयित पतीचे नाव आहे.

​१२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील झीरो पॉईन्टजवळ संग्राम माने यांच्या शेताजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाची कोणतीही ओळख पटत नसल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
​
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके व औंधचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर यांच्या पथकाने घटनास्थळ आणि संभाव्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने मागोवा घेण्यास सुरुवात केली. सलग १२ दिवस सातारा, सांगली, सोलापूर आणि थेट कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील फुटेजची पडताळणी करण्यात आली. अखेर एका संशयित वाहनाचा क्रमांक पोलिसांच्या हाती लागला.

वाहनाच्या नोंदणीकृत माहितीवरून पोलिसांनी मांडवे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी कौशल्याने आणि सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला राजाचे कुर्ले येथे आणून तिचा खून केल्याचे त्याने मान्य केले. ​अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असलेला हा खून कौशल्यपूर्ण तपासाअंती अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे.