सातारा: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ मदत मिळावी यासाठी कार्यान्वित असलेल्या ‘डायल ११२’ या पोलीस हेल्पलाइन क्रमांकाचा गैरवापर करून वारंवार खोटे कॉल्स करणाऱ्या नागठाणे (जि. सातारा) येथील एका इसमावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. संभाजी धोंडीराम ढाणे (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संशयित डॉ. संभाजी ढाणे याने ‘डायल ११२’ वर कॉल करून नागठाणे हद्दीतील सासपडे चौक येथे लाऊडस्पिकरचा मोठा आवाज सुरू असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अंमलदार अशोक माने व होमगार्ड अमित कणसे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांनी तक्रारदाराच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. तसेच, परिसरातील ग्रामस्थांकडे चौकशी केली असता तेथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले.

​विशेष म्हणजे, यापूर्वीही या इसमाने वारंवार ‘डायल ११२’ वर संपर्क साधून पोलीस मदतीची मागणी केली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर तो फोन न उचलणे किंवा घराचे दार न उघडणे असे प्रकार करत होता. यावरून तो जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन हेल्पलाइनचा गैरवापर करत असल्याचे स्पष्ट झाल्याने, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१७ अन्वये बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, आणि पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस अंमलदार अशोक माने व होमगार्ड अमित कणसे यांनी केली.

​अनावश्यक कॉल्स टाळा: पोलिसांचे आवाहन

‘डायल ११२ ही यंत्रणा अपघात, चोरी, दरोडा, महिलांवरील अत्याचार, अग्निशमन अथवा वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी नागरिकांच्या मदतीसाठी आहे. या अतिमहत्त्वाच्या यंत्रणेवर खोटे कॉल्स करून पोलीस प्रशासनाचा वेळ वाया घालवू नये,’असे आवाहन बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी केले आहे.