सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून परस्परांशी संवाद टाळणारे भाजप नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये बैठका, चर्चांचे सत्र सुरू झाले आहे. महायुती म्हणून ही निवडणूक एकत्र लढवण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेल्या अभूतपूर्व राजकीय गोंधळानंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महायुती अंतर्गत एकमेकांचा अंदाज घेण्यात वेळ जात होता. दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘बँकेत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’असा आक्रमक इशारा देत ही निवडणूक राजकारणविरहित ठेवण्याचे आवाहन केले. या घडामोडीनंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंशी प्राथमिक चर्चा करून निर्णयाचे सर्व अधिकार त्यांना दिले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीत कोणताही बेबनाव नको, सन्मानाने चर्चा करून एकत्र पुढे जाण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.
जिल्ह्यातील भाजपचे नेते मंत्री शिवेंद्रसिंहराजे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांच्यामध्ये शनिवारी रात्री चर्चा झाली. यानंतर रविवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांच्यामध्ये एक बैठक झाली. त्या पुढे आज सोमवारी दुपारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शिवेंद्रसिहराजे मकरंद पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार नितीन पाटील आणि आमदार धैर्यशील कदम उपस्थित होते. स्व. अभयसिंहराजे भोसले आणि स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जुन्या मैत्रीचे दाखले देत ‘बाबा-आबा’ यांनी एकत्र यावे, हीच जनभावना असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या बैठकीनंतर मंत्री शिवेंद्रराजेंनी खा. उदयनराजे भोसले यांचीही भेट घेऊन चर्चा केली.
पुढील दोन दिवसांत दोन्ही नेते आपापल्या मित्रपक्षांशी चर्चा करून जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवणार आहेत. शिवेंद्रसिंहराजे मकरंद पाटील यांच्यातील हा संवाद असाच कायम टिकतो, की आगामी काळात पुन्हा काही वेगळी राजकीय वळणे मिळतात, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
३५७ अर्जांची विक्री
सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्जविक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत ३५७ अर्जांची विक्री झाली आहे. दोन दिवसांत २२ उमेदवारांचे २५ अर्ज दाखल झाले आहेत. रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर व मनोज घोरपडे या प्रमुख नेत्यांनी अर्ज दाखल केले. उर्वरित अर्ज १ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी कार्यालयात केवळ उमेदवार किंवा सूचकांनाच प्रवेश दिला जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
