सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांचा अक्षरशः पाऊस पडला. शेवटच्या दिवशी १७० उमेदवारांनी २३६ नामनिर्देशनपत्रे दाखल केल्याने २१ संचालकपदांच्या जागांसाठीची लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत. आता ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननीकडे आणि त्यानंतरच्या उमेदवारी माघारीच्या टप्प्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक कार्यालयात मोठी राजकीय गर्दी पाहायला मिळाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नितीन पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिंदेसेनेचे शेखर गोरे या मातब्बर दिग्गजांनी आपले शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत.

विकास सेवा सोसायटी मतदारसंघातील ११ जागांसाठी विविध तालुक्यांमधून तब्बल ७४ अर्ज आले आहेत. याशिवाय महिला राखीव (२८), इतर मागास प्रवर्ग (३०), अनुसूचित जाती (१५), भटक्या जमाती (२४), नागरी बँक (२४) आणि औद्योगिक/मजूर मतदारसंघात (२६) अर्ज दाखल झाले आहेत. छाननीतील तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी काही नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांचे पर्यायी अर्जही भरले आहेत. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ‘यशवंतराव चव्हाण सभागृहात’ अर्जांची छाननी होणार आहे. महायुतीचे अनेक दिग्गज रिंगणात उतरल्याने बिनविरोधच्या प्रयत्नांनंतरही पक्षांतर्गत आणि स्थानिक लढतींची ईर्ष्या वाढली आहे.

महायुतीत अद्याप निश्चित फॉर्म्युला ठरला नाही. महायुतीतील तीनही पक्षांच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय होईल. केवळ पक्षीय दाव्यांपेक्षा नेत्याची स्थानिक ताकद आणि प्रभाव पाहूनच उमेदवारी निश्चित व्हावी, अशी ठाम भूमिका आहे. बँकेचा कारभार नाबार्ड व रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार पारदर्शक आणि शिस्तबद्ध सुरू असल्याचे सांगत, अर्जांच्या माघारीनंतरच सत्ताकारणाची खरी दिशा स्पष्ट होईल. – शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री .