सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी पार पडलेल्या मतदानादरम्यान खंडाळा, पाटण आणि जावळी तालुक्यांत राजकीय तणाव व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारीची, घोषणाबाजीची घटना घडली. खंडाळा येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व मारामारी झाली, तर फलटणमध्ये पारंपरिक वैरी असलेल्या नेत्यांमध्ये अनपेक्षित दिलखुलास संवाद पाहायला मिळाला.
खंडाळा तालुका सोसायटी मतदारसंघात ५० मतांच्या जादुई आकड्यासाठी राष्ट्रवादीचे अजय भोसले, भाजपचे अनिरुद्ध गाढवे आणि अपक्ष ॲड. शामराव गाढवे यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. भाजपचे मतदार केंद्रावर येत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘वोट चोर’ अशी टीप्पणी केल्याने वातावरणात ठिणगी पडली आणि दोन्ही गट आपसात भिडले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत लाठीचार्जचा इशारा दिल्याने पुढील अनर्थ टळला. तत्पूर्वी, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपापले मतदार सुरक्षितपणे केंद्रावर आणून आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावल्याचे स्पष्ट झाले. माण मतदान केंद्रावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे आपले मतदार घेऊन आले.
दरम्यान, जावळी तालुक्यातील मेढा मतदान केंद्रावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे उमेदवार ज्ञानदेव रांजणे मतदारांना खासगी आरामबसने घेऊन आल्यावर राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांच्या कार्यकर्त्यांशी खडाजंगी झाली. पाटण येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आगमनानंतर पाटणकर व देसाई समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी होऊन तणाव निर्माण झाला होता.
दुसरीकडे फलटणमध्ये राजकीय तणावावर संवादाची फुंकर पाहायला मिळाली. माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मतदान केंद्रावर गाठ पडली. रामराजेंनी ‘जाऊ का? परवानगीने आता…’ अशी कोपरखळी मारताच रणजितदादांनी हस्तांदोलन करत त्यांना वाट मोकळी करून दिली. सर्व राजकीय नेत्यांनी आपापले मतदार सुरक्षिततेच्या मतदान केंद्रांवर आणले. मतदानापूर्वी प्रचारामध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवत असणाऱ्या नेत्यांनी मतदानावेळी मात्र पक्षाचा प्रचार केल्याचे व आपले हितसंबंध सांभाळायला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
सातारा, कराड, माण, वाई आणि कोरेगाव येथे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. माणमध्ये मंत्री जयकुमार गोरे सोलापूरहून मतदारांना बसने घेऊन आले. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे जिल्हाभरात अनुचित प्रकार टळल्याने निवडणूक सुरळीत पार पडली.
निवडणुकीदरम्यान माण तालुक्यात स्वतःला निरीक्षक अधिकारी भासवून विविध मतदान केंद्रांवर फिरणाऱ्या एका बोगस महिला अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. निवडणुकीच्या काळात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बिनधास्त चहापान करत या महिला अधिकाऱ्याने सर्वांनाच फसवले. संशय आल्यानंतर पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतले असून, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
