सातारा : ‘राजकारणात कायमस्वरूपी कोणी कोणाचा मित्र किंवा शत्रू नसतो’, या उक्तीचा प्रत्यक्ष प्रत्यय साताऱ्यातील शेंद्रे येथे आला. गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करणारे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर हे महायुतीच्या मेळाव्यात केवळ शेजारी बसले नाहीत, तर त्यांच्यात बराच वेळ गप्पांचा फड रंगला. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या राजकीय घडामोडीने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगवली आहे.

​सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने स्व. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतदारांचा मेळावा पार पडला. या वेळी नेत्यांनी निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली; मात्र उपस्थितांचे सर्वाधिक लक्ष रामराजे आणि जयकुमार गोरे यांच्या संवादाने वेधून घेतले.

​जागावाटपाचे नवे गणित

या मेळाव्यात महायुतीच्या जागावाटपाचे सूत्रही स्पष्ट झाले. जिल्हा बँकेच्या जागावाटपानुसार भाजपला पाच, राष्ट्रवादीला तीन आणि शिवसेनेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जागा रामराजे गटाला, तर विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील जागा गोरे समर्थकाला देण्यात आली आहे. या राजकीय समीकरणांमुळे परस्परविरोधी नेत्यांनाही एकमेकांच्या सहकार्याची गरज भासू लागली आहे.

​जागावाटप आणि राखीव प्रवर्गातील मतांची जुळवाजुळव पाहता, निवडणुकीपुरते वैर बाजूला ठेवून महायुतीतील नेते एकत्र आल्याचे दिसते. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भोसले, मकरंद पाटील, आ. धैर्यशील कदम, माजी आमदार दीपक चव्हाण यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात हे राजकीय मतभेद खरोखरच बाजूला राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.