सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत अत्यंत शांततेत, उत्साहात आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. निर्धारित वेळेत सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ९७.९२ टक्के एवढ्या विक्रमी मतदानाची नोंद झाली. जिल्ह्यातील २०२१ एकूण मतदारांपैकी १९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, ज्यामध्ये १८१८ पुरुष व १६१ महिला मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कोरेगाव, खंडाळा आणि वाई या तीन तालुक्यांमध्ये १०० टक्के मतदान नोंदवले गेले.
तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी :
कोरेगाव : १२७ पैकी १२७ (१०० टक्के)
खंडाळा : ८८ पैकी ८८ (१०० टक्के)
वाई : १४२ पैकी १४२ (१०० टक्के)
पाटण : १९९ पैकी १९७ (९८.९९)
सातारा : ४७३ पैकी ४६७ (९८.७३)
कराड : ३३६ पैकी ३३० (९८.२१)
माण : १२३ पैकी ११९ (९६.७४)
खटाव : १५० पैकी १४५ (९६.६६)
फलटण : २६३ पैकी २५३ (९६.१९)
जावली : ६९ पैकी ६५ (९४.२०)
महाबळेश्वर : ५१ पैकी ४६ (९०.२०)
प्रशासकीय चोख व्यवस्था व कडक पोलीस बंदोबस्त
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्या नियोजनाखाली सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिमान थोरात व राहुल देशमुख यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

उद्या मतमोजणी; कडक सुरक्षेत मतपेट्या संकलित
मतदान प्रक्रियेनंतर सर्व तालुक्यांतील मतपेट्या सातारा येथील जरंडेश्वर नाक्याजवळ असलेल्या ‘सातारा जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन’च्या इमारतीतील सुरक्षा कक्षात सीलबंद करून सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत.

उद्या (मंगळवारी) सकाळी आठ वाजता याच सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आले असून, ती दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाईल. सर्वप्रथम उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर मतपेट्या उघडून मतदारसंघांनुसार मतपत्रिकांचे गठ्ठे वेगळे केले जातील. त्यानंतर प्रथम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघाची आणि नंतर राखीव व औद्योगिक मजूर मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. मतमोजणी केंद्रावर केवळ अधिकृत उमेदवार व नमुना ८-अ अर्ज भरलेल्या मतमोजणी प्रतिनिधींनाच ओळखपत्रासह प्रवेश दिला जाणार आहे.
