सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीचे सर्व २१ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने ९ जागांवर विजय मिळवत सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ८, तर शिवसेनेने ४ जागांवर विजय संपादन केला आहे. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांनी एकूण २१ जागांवर विजय संपादन केला आहे. यामध्ये काही ठिकाणी महायुतीअंतर्गतच लढत झाली. यामध्ये माणमध्ये ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दणदणीत विजय मिळवून सहकार क्षेत्रातील वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. या निवडणुकीत जिल्ह्यात एकेकाळी प्रबळ असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस हे दोन्हीही पक्ष आपले अस्तित्वही दाखवू शकले नाहीत.
या निवडणुकीत जिल्ह्यातील अनेक मंत्र्यांची व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अटीतटीच्या झालेल्या या संघर्षात काही ठिकाणी मोठ्या फरकाने, तर काही ठिकाणी अत्यंत नाट्यमयरीत्या विजय-पराजयाचा फैसला झाला.
शंभूराज देसाई (पाटण) : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा १२ मतांनी पराभव करत ४२ वर्षांनंतर या मतदारसंघात देसाई गटाचा झेंडा फडकवला आणि मागील पराभवाची परतफेड केली.
जयकुमार गोरे (माण) : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ५३ मते मिळवत दणदणीत विजय मिळवून सहकार क्षेत्रातील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
संजीवराजे निंबाळकर (फलटण): शिवसेनेचे संजीवराजे यांनी समशेरसिंह निंबाळकर यांचा पराभव करत फलटणमधील राजकीय पकड कायम ठेवली.
सुनील माने (कोरेगाव): कोरेगावमध्ये मतांची बरोबरी झाल्याने अखेर ईश्वरचिठ्ठीद्वारे राष्ट्रवादीचे सुनील माने यांना विजयी घोषित करण्यात आले. ज्यामुळे मोठा थरार पाहायला मिळाला.
रुपाली राजपुरे (महाबळेश्वर) : राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी चुरशीच्या लढतीत अवघ्या चार मतांनी विजय मिळवला.
जिल्ह्यातील २,०२१ पैकी १,९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ९७.९२ टक्के विक्रमी मतदान झाले. एकूण २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानाने राजकीय तापमान वाढवले होते.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप सर्वाधिक जागांसह आघाडीवर असला, तरी राष्ट्रवादीचे आठ आणि शिवसेनेचे चार संचालक असल्याने आगामी सत्तासमीकरणात स्थानिक नेत्यांचे जुळवाजुळव तंत्र आणि राजकीय समन्वय अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
ठळक मुद्दे
- पाटणमध्ये शंभूराज देसाईंचा ५८ मतांनी विजय
- माणमध्ये जयकुमार गोरेंनी बंधू शेखर गोरेंना हरवले
- फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव,
- महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे अटीतटीच्या लढाईत अवघ्या चार मतांनी विजयी
- कोरेगाव येथे सुनील माने ईश्वर चिठ्ठीवर विजयी
- या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावहीन
भारतीय जनता पक्ष – ९ जागा
सातारा सोसायटी – सर्जेराव सावंत (बिनविरोध), माण सोसायटी – जयकुमार गोरे, जावळी सोसायटी – ज्ञानदेव रांजणे, सर्वसामान्य – अतुल भोसले (बिनविरोध), गृहनिर्माण – सोमनाथ धुमाळ (बिनविरोध), भटक्या विमुक्त – अर्जुन काळे, पतसंस्था पतपेढी – रणजितसिंह नाईक निंबाळकर (बिनविरोध), खटाव सोसायटी – नंदकुमार मोरे (बिनविरोध), मजूर व विणकर – चंद्रकांत जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस – ८ जागा
वाई सोसायटी – सत्यजित वीर (बिनविरोध), खरेदी-विक्री संघ – मकरंद पाटील (बिनविरोध), महिला राखीव – ऋतुजा पाटील वाठारकर (बिनविरोध), कराड सोसायटी – उदयसिंह पाटील उंडाळकर, महाबळेश्वर सोसायटी – रुपाली राजापुरे, खंडाळा सोसायटी – अजय भोसले, इतर मागास – योगेश फडतरे, कोरेगाव सोसायटी – सुनील माने (ईश्वर चिठ्ठीने विजयी)
शिवसेना – ४ जागा
पाटण सोसायटी – मंत्री शंभूराज देसाई, फलटण सोसायटी – संजीवराजे नाईक निंबाळकर, महिला राखीव – मंगल पाटील, अनुसूचित जाती – दीपक चव्हाण
एकूण – भाजप ९, राष्ट्रवादी ८, शिवसेना ४
