सातारा :सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार आजवर राजकारणविरहित राहिलेला असून, यापुढेही बँकेत राजकारण न आणता विकास पुढे नेणे गरजेचे आहे. राज्यस्तरावरून आलेल्या सूचनेनुसार ही निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार नितीन पाटील, आमदार धैर्यशील कदम, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई आदी प्रमुख नेते उपस्थित होते. या प्राथमिक बैठकीत जागा वाटप व पॅनेल रचनेबाबत चर्चा झाली. सोसायटी मतदारसंघ आपापल्या स्तरावर आणि उर्वरित १० जागा पॅनेलमधून जागा वाटप करून लढविल्या जातील. रामराजे निंबाळकर व जयकुमार गोरे यांच्यातील मतभेदांबाबत विचारले असता, व्यक्तिशः मतभेद असले तरी महायुती म्हणून सर्वांनी एकत्र काम करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. मतभेदांपेक्षा बँकेचे हित अत्यंत महत्त्वाचे आहे, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळसदृश परिस्थितीबाबत बोलताना मंत्री भोसले म्हणाले की, पहिल्या यादीत नसलेल्या दुष्काळी तालुक्यांची नावे दुसऱ्या यादीत निश्चित येतील. राज्य शासनाने दुष्काळाच्या सर्व उपाययोजना लागू केल्या असून पंचनाम्यानंतर नुकसानीनुसार योग्य भरपाई दिली जाईल. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी नगरसेवक अविनाश कदम, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार आणि पंचायत समिती सभापती महेश गाडे उपस्थित होते.
काँग्रेसने पराभवानंतर निवडणूक आयोगावर खापर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणामुळे राहुल गांधींचे फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त झाले आहे, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. पराभवानंतर संवैधानिक संस्थांवर अविश्वास दाखवून संभ्रम निर्माण करणे ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे. कर्नाटक, तेलंगणा जिंकल्यावर लोकशाहीचा विजय आणि पराभवानंतर व्हीव्हीपॅट किंवा निवडणूक प्रक्रियेवर संशय घेण्याची पद्धत चुकीची आहे. एसआयआर आणि मतदार याद्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता असून काँग्रेसने आरोपांऐवजी आत्मपरीक्षण करावे, असे ते म्हणाले
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात सोमवारी रात्री नव्याने घडामोड घडली. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि कराड येथील राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील यांच्यात साताऱ्यात रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकी ला खासदार उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठकांचे सत्र आहे. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत रोज नव्याने बैठक होत असल्याने कोणत्या निर्णयापर्यंत जिल्ह्यातील मंत्री,आमदार आणि खासदार जाणार याची उत्सुकता सातारकरांना लागून राहिली आहे.
