सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (रविवारी) होत असलेल्या मतदानामुळे जिल्ह्याचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. एकूण २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी उर्वरित १२ जागांवरील निवडणूक महायुतीमधील अंतर्गत संघर्षाने कमालीची चुरशीची केली आहे. जिल्ह्याची ‘अर्थवाहिनी’ समजल्या जाणाऱ्या या बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रस्थापितांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
बिनविरोध निवड झालेल्यांमध्ये खरेदी-विक्री संघातून मकरंद पाटील, कृषी प्रक्रियेतून आ. डॉ. अतुल भोसले, गृहनिर्माण व दूध संघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर, नागरी बँक व पतसंस्थेतून सोमनाथ ऊर्फ काका धुमाळ, सातारा सोसायटीतून संजय सावंत, खटाव सोसायटीतून नंदकुमार मोरे, वाई सोसायटीतून सत्यजित वीर, तर महिला राखीवमधून ऋतुजा पाटील आणि मंगल पाटील यांचा समावेश आहे. यामुळे बिनविरोधचा टप्पा पार झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष उर्वरित १२ जागांच्या लढतीकडे लागले आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला काही उमेदवारांनी मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मतदारांवर दबाव, फोडाफोडीचे राजकारण आणि छुप्या उपकरणांच्या वापराबद्दल धाकधूक वाढली आहे. मतदान केंद्रांवर पेन, चष्मा, घड्याळ किंवा शर्टाच्या बटनामधील गुप्त कॅमेऱ्याच्या वापरावर कडक निर्बंध आणण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी अखेर कोणाच्या हाती जाणार आणि मतदार नेमका कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार, याचे चित्र उद्याच्या मतदानानंतर स्पष्ट होईल.
प्रमुख मतदारसंघांमधील अटीतटीचे सामने
माण सोसायटी मतदारसंघ : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात त्यांचेच बंधू शेखर गोरे रिंगणात उतरल्याने आणि त्यात राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांनी भर घातल्याने येथे तिरंगी आणि अत्यंत प्रतिष्ठेची लढत होत आहे. एकाच घरातील दोन बडे चेहरे आमनेसामने आल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
फलटण सोसायटी मतदारसंघ : आ. रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर विरुद्ध माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील थेट संघर्षामुळे फलटणमधील राजकीय वर्चस्वाचा नवा अध्याय या निवडणुकीतून लिहिला जाणार आहे.
खंडाळा मतदारसंघ : खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले आणि भाजपचे अनिरुद्ध गाढवे, तसेच ॲड. श्याम गाढवे यांच्यामुळे तिरंगी सामना होत आहे.
कोरेगाव मतदारसंघ : सुनील माने विरुद्ध सुनील खत्री यांच्यातील लढत आ. महेश शिंदे आणि खासदार नितीन पाटील यांच्यातील राजकीय वर्चस्वाचा फैसला करणारी ठरणार आहे.
जावली मतदारसंघ : आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थित ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे गटाचे विठ्ठल गोळे मैदानात उतरल्याने येथे दोन प्रबळ गटांतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
